मुंबई - शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरू असलेली चर्चा थांबवा, याबाबतचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी घेईन, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर शिवसेना- भाजपमधील युती ही अभेद्य आहे. त्यामुळे विधानसभेच्या तयारीला लागा, अशा कानपिचक्या उध्दव ठाकरेंनी शिवसेना-भाजप आमदारांना दिल्या.
आज संध्याकाळी 5 वाजता विधानसभेत शिवसेना-भाजपच्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. विधानभवनातील पाचव्या मजल्यावर सेंटर हॉलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या यशाने भुरळून जाऊ नका. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला संपूर्ण 288 जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे बेसावध राहू नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप आमदारांना दिल्या.