मुंबई : काल दसरा मेळाव्यात ठाकरे गट, शिंदे गट यात दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यानंतर कुणाच्या दसऱ्या मेळाव्याला अधिक गर्दी होती, यावर चर्चा सुरू असताना आज ठाकरे गटानं भाजपाला धक्का दिलाय. भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी खासदार संजय राऊत तसंच ठाकरे गटातील अन्य नेते उपस्थित होते. यावेळी एकनाथ पवार यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, शिंदे गट तसंच भाजपावर जोरदार टीका केलीय.
अशा घटना क्वचित घडतात. कारण सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात येणं ही बाब दुर्मीळ आहे. कारण आज आमच्याकडं काहीच नाही. तरी सुद्धा एकनाथ पवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा मला अभिमान आहे. - उद्धव ठाकरे, (पक्ष प्रमुख उबाठा गट)
राज्यात गलिच्छ राजकारण : पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय. याचसाठी तुम्ही पक्ष वाढवत होता का? दुसऱ्याच्या सतरंज्या उचलण्यासाठी पक्ष वाढवला का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचं नाव न घेता उपस्थित केला. माझ्या मंत्रिमंडळात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. यावेळी तुम्ही त्यांच्याविरोधात रान उठवलं होतं. पंतप्रधान मोदींनी देखील 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, असं वक्तव्य केलं होतं. चक्की पिसिंग करायला लावणार, असं भाजपा अजित पवारांना म्हणत होतं. मात्र, त्यानंतर तेच अजित पवार तुमच्यासोबत सत्तेत आहेत. मग ही सगळी बांधणी कोण पुसून टाकणार, याचसाठी तुम्ही हे सर्व केलं का? राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गट, भाजपावर टीका केलीय.
'हा' लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही : शिवसेना कधीच मिंधे गट होणार नाही. आजही काहीजण माझ्यावर आरोप करताहेत. तुम्ही काँग्रेससोबत गेलात, म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं. पण मी सांगतो, आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही, सोडणार नाही. आम्ही भाजपासोबत 25 वर्ष राहून शिवसेना कधीच भाजपा नाही झाली तर, 2 वर्षात शिवसेना काँग्रेसची कशी होणार? असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. माझी जी तळमळ आहे, ती तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी आहे. राज्याला लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही. शिवसेनाप्रमुख हे एक नंबरचं पद होतं, तर शिवसैनिक दोन नंबरचं पद होतं, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. एकनाथ पवार तुम्हाला या दोन्हीमधील दुवा व्हायचं आहे. संघटना वाढवायची आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Ashish Shelar : ठाकरे विकासाच्या वाटेतील गतिरोधक, तुमची ग्रामपंचायतीत तरी सत्ता टिकेल का, आशिष शेलार यांचा टोला
- Ravindra Chavan On Nilesh Rane : निलेश राणेंची रिटायरमेंट बारगळली? पुन्हा कोकणातील राजकारणात सक्रिय होणार - रविंद्र चव्हाण
- Sanjay Raut News: भाजपाच्या सहवासात आल्यापासून मुख्यमंत्री खोट्या शपथा घेऊ लागले-संजय राऊत