मुंबई - शनिवारी ठाकरे गटाचा धडक मोर्चा निघणार आहे. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्सपासून ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक सहभागी होणार अशल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचा आरोप - मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा असे विविध घाटाळे मुंबई पालिकेत झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
असा निघणार मोर्चा - मेट्रो सिनेमा मरीन लाईन्स ते आझाद मैदान असा हा मोर्चा शनिवारी सायंकाळी चार वाजता निघणार आहे. मुसळधार पाऊस कोसळला, तरी मोर्चा अतिविराट निघेल, अशी घोषणा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी केल्यानंतर शिवसैनिकांमध्येही उत्साह आला आहे.
मोर्चासाठी तयारी पूर्ण - ठाकरे गटाने मोर्चासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या शाखा-शाखांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या. शिवसेना भवनमध्ये मोर्चाची तयारी म्हणून रोज बैठका घेण्यात आल्या होत्या. या भव्य मोर्चामध्ये खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनीही या मोर्चात सहभागी होणार आहेत.
राजकारण तापले - ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलैला मुंबई महापालिकेवर अतिविराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला प्रत्युतर देण्यासाठी आता भाजप सज्ज झाली असून भाजपने सुद्धा उद्या मुंबईत विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे. या विषयावर बोलताना भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे लागली मिर्ची, निघाला मोर्चा.. अशा पद्धतीचा आहे.