मुंबई - युती टिकवायची असेल तर प्रामाणिकपणाची आवश्यकता आहे. आम्ही युतीत दगा देणार नाही. तुम्हीही आम्हाला दगा देऊ नका, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी भाजपकडून व्यक्त केली. शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आता समज - गैरसमज दूर केले नाहीत तर दोघांचे नुकसान होईल. दैव देते आणि कर्म नेते अशी आपली अवस्था होईल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला युतीधर्म जपण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून धडपड...
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या गोष्टीचा उद्धव ठाकरेंनी यावेळी पुनरुच्चार केला. ठाकरे म्हणाले, की लोकांची कामे करण्यासाठी अधिकार पाहिजेत. अधिकाराबरोबर जबाबदारीचे भानही पाहिजे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी धडपड करतोय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी युतीत अधिकारांचे आणि जबाबदारीचे समसमान वाटप होईल. या वाक्याची आठवण करुन दिली. यावरुन शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल याचा त्यांनी सूचक उल्लेख केला.
युती टिकण्यासाठी प्रामाणिकपणा हवा
युती होण्यासाठी शिवसेनेच्या कोणत्याही खासदार किंवा मंत्र्यांच्या दबाव नव्हता. उलट ते शिवसैनिकासारखे वागले, असे ठाकरे म्हणाले. भाजप आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वावर आधारित आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ही युती २५ वर्षे टिकली. दोघांनी मिळून ज्यांच्याशी संघर्ष केला ते विसरता कामा नये, असे ठाकरे म्हणाले. ज्या देशात हिंदुत्व ही शिवी होती. त्या देशात बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची जाग आणली. त्यामुळे युतीतील गैरसमज दूर केले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा केली.
शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका बजावली
विरोधी पक्षावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, की गेल्या साडेतीन वर्षात विरोधी पक्ष अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षाचे कामही शिवसेनेला करावे लागले. जनतेच्या हितासाठी आम्ही हे काम केले. सत्तेवर अंकुश ठेवणार कुणी तरी पाहिजे. ते काम विरोधी पक्षांचे असते असे ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे. त्यांच्यात गोंधळाचे वातावरण आहे. अजून त्यांच्यात जागावाटपाबाबतही एकमत झाले नाही. दररोज विरोधी पक्षातला कुणीतरी भाजप किंवा शिवसेनेत येत आहे. एखादा नेता आपल्यावर खूप टीका करतोय. आपण ठरवले की याला आता ठोकायचा. तो विचार पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबापैकी कुणीतरी युतीतल्या कोणत्यातरी पक्षात येतो, असे ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले.