मुंबई : रिझर्व बँकेने २ हजाराच्या नोटा सप्टेंबरनंतर चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या पैशाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात असले तरी या मुद्द्यावर सुद्धा राजकारण तापले आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
सिद्धरामयांच्या शपथविधीला अनुपस्थितीत : रिझर्व बँकेने काल सप्टेंबरनंतर चलनातून २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अनेकांचे धावे दणाणले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही चिंता वाढली असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आज शपथविधी होत असून देशभरातील नेते या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शपथविधीला जाणार नसल्याने त्याबाबत नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. दोन हजार रुपयांची नोट बंद झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. त्यासोबत काल नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर एक महत्त्वाची बैठक मातोश्रीवर झाली होती. या बैठकीमध्ये कशा पद्धतीने २ हजारच्या नोटबंदी संदर्भामध्ये काय करता येईल याचा आढावा घेण्यात आला. याच कारणास्तव उद्धवजी शपथविधीला जात नाही आहेत, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
शिवसेना पैसा देशाबाहेर : शिवसेनेत पैशाशिवाय कुठलीही पद दिली जात नाहीत. शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे गुण मातोश्री बरोबर जुळत आहेत. म्हणून त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. परंतु प्रामाणिक लोकांची हकालपट्टी केली जाते. सोफा व एसीसाठी पैसे मागणाऱ्या लोकांना महाप्रबोधन यात्रा करण्याची मुभा दिली जाते, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला. तसेच शिवसेनेकडे असलेला पैसा देशाबाहेर असलेले नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे आहे. म्हणून ते देशाबाहेर पळून गेले आहेत, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
शिवसेनेला यंदा ९६ जागा? : मागच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १६ जागांचा फॉर्मुला ठरला असून त्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा होकार दिला होता. पण त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी ९६ जागांचा फॉर्मुला ठरला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत पुढच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. परंतु २०१९ च्या विधासभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत होती आणि भाजपने १६४ जागा लढवल्या होत्या. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला १२२ जागा दिल्या होत्या. आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना १२२ वरून ९६ जागेवर आणले आहे. तसेच तेव्हा १२२ जागा लढवून उद्धव ठाकरे गटाचे ५४ आमदार निवडून आले होते. तर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये ९६ जागा लढवून ते २० जागेच्या पुढे जाणार तरी आहेत का? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या -