मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती असून ज्या स्वप्नाची वाट महाराष्ट्राची जनता पाहत होती. ते आता पूर्ण होत आहे, याचा मला अभिमान आहे. देशाच्या हितासाठी आणि पुढची वाटचाल एकत्र लढण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेत युतीवर शिक्कामोर्तब : आजवर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्यांनी दगा दिला. मात्र, फसवणूक करणाऱ्यांना पुरून उरून उरलो. हेतू चांगला असेल तर सगळे ठीक होते. आता राजकीय बापजाद्यानी हिंमत असेल आगामी निवडणूक घेऊन दाखवा, असे थेट आव्हान देखील ठाकरेंनी विरोधकांना देत ललकारले. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आज शिक्कामोर्तब करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ठाकरे बोलत होते.
एका स्वप्नाची पूर्ती : ऐतिहासिक घटना आज या ठिकाणी घडत आहे, याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. अनेक दिवस चर्चा सुरु होती. अनेक बैठका झाल्या. जे संकट पुढे ठेपले आहे यासाठी या युतीची घोषणा करत आहोत, असे सांगत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. तर उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करताना, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आता देखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि आरएसएससह भाजपवर पत्रकार परिषदेत सडकून टीका केली.
हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल : उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र असून सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येणार आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी पुढील वाटचाल करण्यासाठी येथे आम्ही एकत्र आलो असून जे जीवाला जीव देणारे सहकारी आहेत, ते एकत्र आले आहेत, असे ठाकरे म्हणाले. तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येत आहोत. घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी आम्ही आलो आहोत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. जे काही देशात चालले आहे, ते देशातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझ्याच लोकांनी दगा दिला : शरद पवारांसोबत माझे पूर्वी चांगलेल सख्य होते, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाचा समाचार घेतला. मला माझ्यासोबतची तत्कालीन सहकारी शरद पवार चांगले नाहीत, दगा देतील असे सांगत राहिले. मी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पवारांकडेच बघत राहिलो. पण ज्यांनी सांगितले त्या माझ्याच लोकांनी मला दिगा दिला, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाकरेंच्या या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला. वंचितच्या मविआतील घटक असून त्यांनी देखील तसे सहकार्य करावे, असे ठाकरेंनी सांगतिले.
हुकूमशाहीविरोधात एकत्र : मोदी आणि भाजपविरोधात, हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वंचितला विरोध करतील असे वाटत नाही. लवकरच दोन्ही पक्षांची चर्चा करुन याबाबत भूमिका स्पष्ट करू. तसेच, वंचितसोबत व इतर मित्र पक्षांसोबत जागावाटप कसे होईल, याबाबत विचार करुनच वंचितसोबत युती केल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकशाही याला म्हणायचे का : सध्या देशात न्यायालये, तपास यंत्रणा सर्वांवरच दबाव आहे. नुकतेच कायदामंत्री किरण रिजीजू म्हणाले की, न्यायालयांमध्येही लोकप्रतिनिधींनी नियुक्त केलेले न्यायाधीश असावेत. केंद्रीय कायदामंत्र्यांचे हे वक्तव्य संविधानाला अनुसुरुन आहे का? यालाच लोकशाही म्हणायचे का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपने तर जम्मू-काश्मिरात पीडीपी पक्षासोबत युती केली. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आरएसएस संपवण्याची भाषा केली होती, त्या नितीश कुमारांसोबत भाजपने युती केली. म्हणजे भाजपने बाहेरख्याली केली तरी चालते आणि आम्ही वटपौर्णिमा जरी साजरी केली, तरी यांचा आक्षेप,अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर आसूड ओढले.
शिवसेनेचे हिंदुत्व मान्य - प्रकाश आंबेडकर : शिवसेना आणि प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. प्रबोधनकारांनी समाज व्यवस्थेत सुधारणा व्हावी, या दृष्टीकोनातून हिंदुत्वाची मांडणी केली. सर्व समाजाला एकत्र आणणारे त्यांचे हिंदुत्व होते. हे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आरएसएस आणि नरेंद्र मोदी देशात जातीवादी राजकारण करत आहेत. 2002 ची एक बीबीसीची डॉक्युमेंट्रीही नरेंद्र मोदींना आता सहन होत नाही. या माहितीपटावर बंदी घातली जात आहे. ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. मात्र, मोदींचे नेतृत्वही एक दिवस संपुष्टात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.