मुंबई - घाटकोपरच्या रमाबाईनगर येथील दक्षता पोलीस सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. या सोसायटीमधील अनेक इमारतींमध्ये स्लॅब कोसळण्याच्या घटना याआधीही घडल्याने येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. महापालिका आणि सोसायटीचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याआधीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
घाटकोपर रमाबाई नगरमध्ये पोलीस आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी १९९६ साली दक्षता पोलीस वसाहत बांधण्यात आली. येथील सी २ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भागवत गोरडे यांच्या २६ क्रमांकाच्या घराच्या स्लॅब दुरुस्तीचे काम सुरू होते. दोन-तीन दिवस सुरू असलेल्या कामावेळी वरील मजल्यावर असलेल्या कुटे कुटुंबीयांनी स्लॅब धोकादायक झाला असल्याचे गोरडे व कंत्राटदाराच्या निदर्शनास आणले. मात्र, त्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केले.
आज सकाळी शिवाजी कुटे व त्यांच्या पत्नी बाहेरील रूममध्ये पलंगावर बसल्या असतानाच स्लॅब कोसळला. यावेळी दुसऱ्या माळ्यावरील कुटे आणि त्यांच्या पत्नी पहिल्या मजल्यावर कोसळल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना कोहिनूर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटे यांच्या मणक्याला तर त्यांच्या पत्नीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे त्यांचे जावई रावसाहेब आव्हाड यांनी सांगितले.
याआधीही दक्षता सोसायटीमधील याच इमारती असलेल्या सी ३ या इमारतीमधील ४७ क्रमांकाच्या घरामधील स्लॅब २२ मे रोजी कोसळला होता. प्रसाद पाटील यांच्या मालकीच्या घरात सध्या पगारे कुटुंबीय राहतात. स्लॅब कोसळला तेव्हा पगारे कुटुंबामधील चार व्यक्ती घरात होत्या. त्यांचे नशीब चांगले म्हणून ते या दुर्घटनेतून वाचले. आजही त्यांच्या घरातील स्लॅब थोडा थोडा पडत आहे. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी पुन्हा भाडे देऊन राहावे लागत आहे. स्लॅब कोसळण्याचा प्रकार या ठिकाणी वारंवार होत आहेत. मात्र, सोसायटीचे पदाधिकारी आणि महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याआधीच दखल घेऊन रहिवाशांचा जीव वाचवावा, अशी मागणी रेखा पगारे यांनी केली आहे.