मुंबई - आजपर्यंत आपण अस्मानी संकटे पाहिली, महापूर पाहिले, दुष्काळ सहन केला, डेंग्युसारख्या साथीही येऊन गेल्या. पण कोरोनाने आता जीवन-मरणाचा प्रश्न उभा केला आहे. या महामारीच्या संकटातून आपल्याला संपूर्ण समाजाला वाचवायचे आहे. हे खूप कठीण काम आहे. आपल्या वर्धापनदिनी आपण रक्तदान शिबीरांचे आयोजन करून गरज असलेल्या रुग्णांना मदत करुया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला उद्या दोन दशके पूर्ण होत आहेत.
शरद पवार यांनी एक निवेदन जारी करून हे आवाहन केले आहे. 'जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. आपल्या देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यातही आपल्या महाराष्ट्रावर या विषाणूने मोठा हल्ला केला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या प्रंचड वाढली. मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीपासून थेट पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला, अमरावती आणि नागपूरपर्यंत हा फैलाव वाढला. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करण्याचे आवाहन पवारांनी या निवेदनाद्वारे केले आहे.
येणारा काळ हा आपल्यासाठी कसोटीचा ठरणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन होता. त्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थलांतरीत मजुरांचा संघर्ष तर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता. राज्यात संपूर्ण आरोग्य विभागाचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या कामांचे त्यांनी कौतुक केले. आपण एकजुटीने या संकटाचा सामना करू आणि देशातील तसेच राज्यातील जनतेला या संकटातून बाहेर काढू, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या बुथनुसार कार्यकर्त्यांचे जाळे तयार करून सामान्य जनतेची मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्याला एकूणच जीवनपद्धती बदलावी लागणार आहे. अनावश्यक खर्चावर बंधन घालावे लागणार आहे. नेहमीप्रमाणे समारंभ व प्रसिद्धीसाठी अजिबात खर्च करू नये. त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर शक्य झाल्यास फेस शिल्ड, पीपीई कीट देण्याचे कार्यकर्त्यांना सुचवले. देश सावरायचा असेल, महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी द्यायची असेल तर आपण सगळे वचनबद्ध होऊन राज्यासाठी काम करू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.