मुंबई - शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल परब यांच्या दापोलीतील 'साई रिसॉर्ट'ची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली होती. तसेच, (ED, CBI सह आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही सोमय्या यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून, राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून, सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.