मुंबई- मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकलच्या स्थानाबद्दलची अचूक माहिती मोबाईलवर मिळणार आहे. लोकलची अचूक वेळ आणि सध्या ती कोणत्या स्थानकात आहे, याची माहिती प्रवाशांना कळावी यासाठी मध्य रेल्वेने मेरी लोकल नावाचे एक नवीन अॅप तयार केले आहे.
'मेरी लोकल' या अॅप मध्ये जीपीएसच्या माध्यमातून लोकलची सध्य स्थिती समजण्यास मदत होणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत ते प्रवाशांच्या सेवेत आणण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या प्रत्येक रॅकमध्ये एक जीपीएस यंत्रणा बसविण्यात येईल. यामुळे प्रवासी एखाद्या स्थानकात उभा असल्यास त्याला ज्या लोकलने प्रवास करायचा आहे, ती लोकल कोणत्या स्थानकात किती वाजता येईल याची अचूक वेळ त्याला अॅपद्वारे कळणार आहे. या अॅपमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना नेहमी डोकेदुखी व्हायची. मेरी लोकल या अॅपमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यासाठी प्रवाशांना मोबाईलवर मध्य रेल्वेच 'मेरी लोकल' हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.