मुंबई Train Derail In Maharashtra : मध्य रेल्वेच्या रुळावरुन मालगाडीचे डबे घसरल्यानं मोठी खळबळ उडाली होती. ही घटना रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये शनिवारी दुपारी घडली. या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर चांगलाच परिणाम झाला. आता वाहतूक पनवेल वसई मार्गावरुन वळवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली. मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्यानं मुंबईकडं जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. अपघातामुळे कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली, त्यामुळे दिवा स्थानकात चाकरमान्यांनी रेल रोको आंदोलन केलं.
मालगाडीचे चार डबे घसरले : रायगड जिल्ह्यातील पनवेल कळंबोली ट्रॅकच्या दरम्यान मालगाडीचे चार डबे घसरल्यानं मोठी खळबळ उडाली होती. ही मालगाडी 59 डब्याची होती, मात्र मुंबईकडं जाताना त्यातील चार डबे रुळावरुन घसरल्यानं अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालं नसल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितलं आहे. अपघात झाल्यानंतर रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. या मालगाडीचे 54 डबे सुरक्षित असून त्यांना कळंबोली यार्डात लावण्यात आलं आहे. घटनास्थळी चार डबे असून अपघातात मदतकार्य करणारी रेल्वे दाखल झाली आहे. घटनास्थळावरुन हे डबे हटवण्याचं काम सुरू आहे.
दिवा रेल्वे स्थानकात पुन्हा रेल्वे रोको आंदोलन : पनवेलजवळ रेल्वे रुळावर मालगाडी घसरल्यानं रेल्वेचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडलं आहे. बराच उशीर झाला तरी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या न आल्यानं दिवा स्थानकातील तिन्ही ट्रॅकवर उतरुन संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रवाश्यानी केलेल्या या रेल रोको आंदोलनामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. दिवा-सावंतवाडी ही सकाळी पावणे सात वाजता सुटणारी रेल्वे न आल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. वंदे भारत आणि जनशताब्दी या गाड्या देखील कल्याण कर्जत मार्गे वळवण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तिन्ही ट्रॅकवर उतरुन रेलरोको आंदोलन केलं. सर्वच रेल्वे गाड्या रोखल्यामुळे दिवा लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ जवानांनी ट्रॅकवरुन आंदोलकांना दूर जाण्याचं आवाहन केलं.
लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या वळवल्या : मालगाडीचे डबे घसरलेल्या घटनास्थळावर 250 मजूर कार्यरत आहेत. मालगाडीचे डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती शिवराज मानसपुरे यांनी दिली. पनवेल अप आणि डाऊन मार्गाची एक लेन खुली करण्यात आल्याचं त्यांनी शनिवारी रात्री सांगितलं. या मध्य रेल्वेवर मालगाडीचा अपघात झाल्यानं लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. या मार्गावर पहिली अप ट्रेन 12671 एर्नाकुलम निझामुद्दीन एक्सप्रेस ही पनवेलवरुन रात्री 7.37 वाजता निघाल्याची माहितीही शिवराज मानसपुरे यांनी दिली.
अनेक रेल्वे गाड्यांना उशीर : पनवेल कळंबोली या दरम्यान मालगाडी रेल्वे रुळावरुन घसरल्यानं अनेक गाड्यांना त्याचा फटका बसला. अनेक गाड्या या मालगाड्यांच्या अपघातामुळे उशीरानं धावल्या. त्यामुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र सीएसएमटी नवी मुंबई दरम्यान उपनगरीय गाड्यांवर या मालगाडीच्या अपघाताचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं शिवराज मानसपुरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान पनवेल बेलापूर मार्गावर दोन नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी रेल्वे विभागानं 38 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला होता.
हेही वाचा :