पनवेल - मानखुर्द स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी सकाळी विस्कळीत झाली होती. मात्र, आता तब्बल दोन तासांच्या बिघाड दुरुस्तीनंतर हार्बर मार्गावरील लोकल धावू लागल्या आहेत. दरम्यान, सकाळीच लोकलचे रडगाणे सुरू झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हार्बर रेल्वे मार्ग हा नेहमीच त्याच्या विस्कळीत आणि रखडणाऱ्या वाहतुकीमुळे चर्चेत असतो. सातत्याने वाहतूक रखडणे हे या मार्गाचे वैशिष्ट्य आहे. मानखुर्द येथे लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफला ओव्हरहेड वायर अडकल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला होता. सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ही वाहतुक ठप्प होती. पनवेल वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्याही रद्द केल्या होत्या. त्यामुळे हार्बरच्या प्रत्येक रेल्वे स्थानकांवर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झाली होती.
तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. लोकल उशिराने धावत असल्याने अनेक प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. ऑफिसला जाण्यास उशीर होणार असल्याने आज अनेक चाकरमान्यांचा लेटमार्क लागणार आहे.