सर्व ऐतिहासिक स्मारकं, संग्रहालये 15 जूनपर्यंत राहणार बंद
देशातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आणि संग्रहालये येत्या 15 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या आधी 31 मे पर्यंत स्मारकं-संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घ्येण्यात आला होता. काल त्याला मुदतवाढ देण्यात आली.
येत्या 24 तासात पुण्यासह मुंबईत पूर्वमोसमी पावसाचा इशारा
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यात येत्या 24 तासात मुंबई, पुणे, रायगड, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी विजाच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज मान्सून येणार
भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर आज मान्सून धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, केरळ किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावरही आज पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असंही हवामान विभागाने म्हटले आहे.
आज धनगर समाजाचा आरक्षणासाठी जागर
मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आज धनगर समाजाने आरक्षणासाठी जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच, सोशल मीडियावर समाजबांधवांनी एकत्र येऊन या सरकारचा निषेध नोंदवावा, असेही पडळकरांनी म्हटले आहे. त्यामुळे आज याकडे लक्ष राहणार आहे.
आज चालकविरहीत मेट्रोचा ट्रायल रन
चालकविरहित मेट्रोचा ट्रायल रन आज मुंबईत घेण्यात येणार आहे. यापूर्वी हा ट्रायल रन 31 मार्च रोजी होणार होता. मात्र, कोरोनामुळे हा ट्रायल रन पुढे ढकलावा लागला आहे. आकुर्ली स्टेशनवर मुख्यमंत्री ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
12 वी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवरील सुनावणी आज
CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सीबीएसई बोर्डाने १४ एप्रिल रोजी दहावी परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावरील सुनवाई आज होणार आहे.
मुंबईच्या मेट्रो मार्गिकांची आज चाचणी होणार
मुंबईतील मेट्रो 2-ए आणि मेट्रो 7- ची चाचणी आज होणार आहे. दहिसर-डी. एन. नगर, दहिसर -अंधेरी या मार्गावर चाचणी होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याची माहिती दिली आहे.
कल्याणमधील नव्या दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे आज लोकार्पण
मुंबई-ठाण्याला जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या कल्याण येथील नवीन दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे आज लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता या एका मार्गिकेचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत.
आज अनेक डॉक्टर्स निवृत्त होणार
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट ओढावलेले आहे. अशातच येत्या 31 मे रोजी आणि त्यानंतर विविध जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रावरील तब्बल 550 पेक्षा जास्त डॉक्टर सेवानिवृत्त होत आहे. एकाचवेळी शेकडो डॉक्टर निवृत्त होत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ.गोविंद नरवणे गेल्या 5 वर्षांपासून ते मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र आता त्यांचे वय 58 वर्ष झाले असल्याने ते 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. केवळ डॉ.नरवणेच नाही तर त्यांच्यासोबत राज्यातील विविध भागात कार्यरत असलेले 550 डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहे.