मुंबई : मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांपैकी काही पूल ब्रिटिशकालीन आहेत. सीएसएमटी येथील हिमालय आणि अंधेरी येथील गोखले पूल पडून जीवितहानी झाल्यावर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १८ पूल अतिधोकादायक जाहीर करण्यात आले होते. त्यातील अनेक पूल ब्रिटिशकालीन आहेत. त्यानंतर पालिकेने मुंबईमधील पुलांचे काम हाती घेतले आहे. लवकरच यापैकी पुलांची काम पूर्ण होणार आहेत. यामुळे नागरिकांना ट्रॅफिकच्या समस्सेपासून दिलासा मिळणार आहे.
पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अंधेरी रेल्वे स्थाकाजवळील गोखले पूल दोन वर्षांपूर्वी कोसळला होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर १४ मार्च, २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळला होता. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दोन पुलांच्या दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईमधील सर्वच म्हणजे ३१४ पुलांचे ऑडिट सुरु केले. त्यात १८ हुन अधिक पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले. त्यापैकी काही पूल पाडण्यात आले आहेत. त्याठिकाणी नव्याने पूल बांधण्याची कार्यवाही सुरु आहे. कोरोनाच्या संकटसमयी मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेत धोकादायक पुलांचे काम सुरू ठेवले आहे. मुंबईमधील १४ पुलांचे निष्कासन करून पुनर्बांधणी, ९ पुलांच्या मोठ्या संरचनात्मक दुरुस्त्या आणि १६ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
या पुलांचे बांधकाम पूर्णत्वाकडे : एस. व्ही. रोड, कोरा केंद्र येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तेली गल्ली येथील पुलाचे बांधकाम मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार असून ९५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील राममंदिर रोड ते रिलीफ रोड येथील विस्तारित पुलाचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. विद्याविहार रेल्वे स्थानक रुळावरील उड्डाणपुलाचे बांधकाम सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. विक्रोळी रेल्वे स्थानक रुळावरील उड्डाणपुलाचे बांधकाम मे २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. या दोन्ही पुलांचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले आहे. डिलाईल रोड लोअर परेल येथील पूल ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होणार असून या पुलाचे बांधकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
'या' पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर : पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या पुलाचे २ टक्के बांधकाम झाले असून नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. गोखले पुलाच्या पोहच मार्गाचे काम सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार असून सध्या १० टक्के काम पूर्ण झाले आहे. माहीम कॉजवे येथील मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण, पुनर्बाधणी करण्याचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार असून १० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानक सात रस्ता जंक्शन यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून त्याचे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. मालाड लिंक रोडवरील मिठी चौक जंक्शन उड्डाणपुलाचे बांधकाम २० टक्के पूर्ण झाले असून ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे.
'या' पुलांचे बांधकाम नुकतेच सुरु : वरळी डॉ. ई मोझेस रोडपासून डॉ. बेझंट रोड पर्यंतच्या नाल्यावरील पुलाचे काम आणि नेहरू तारांगण आणि नेहरू सेंटरला जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्ग, जेवीपीडी जंक्शन बर्फीवाला रोडपर्यंत उड्डाणपूल, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील पूल हाजीअली जंक्शन पर्यंत विस्तार करणे, गोरेगाव खाडीवरील पूल, पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजूने सेवा रस्त्याची प्रस्तावित सुधारणा करण्याचे बांधकाम नुकतेच सुरु झाले आहे. ही सर्व कामे २०२५ ते २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हिमालय पूल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल मार्च २०१९ मध्ये कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या पुलाचे काम सुरू असून या पुलाच्या बांधकामासाठी लागणारे गर्डर बसवण्यात आले आहेत. पुलाचे इतर काम, तसेच पायऱ्यांचे काम करून मार्च पर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. तर लवकरच येथे वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना पुलावर ये जा करण्यासाठी एक्सलेटर उभारले जनावर आहेत. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईमधील पुलांसाठी तरतूद :
२०२२ - २३ मध्ये १३८० कोटी
२०२३ - २४ मध्ये २१०० कोटी