मुंबई - ब्रिटन आणि युरोपमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. परंतु याबाबत अधिक काळजी करण्याची आवश्यकता नसून राज्य सरकारने दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात लसीकरणाची तयारी पूर्ण -
कोरोनाच्या या नव्या प्रकारबाबत गांभीर्यांने विचार करण्याची वेळ असून यासाठीच नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'नाईट कर्फ्यु' सारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच या व्हायरसबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरालॉजी येथे संशोधन सुरू असून लवकरच त्याचा अहवाल भारतील वैद्यकीय संशोधन संस्थेला सादर करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रात लसीकरण करण्याची तयारी पूर्ण झाली असून आम्ही केंद्र सरकारच्या निर्देशांची वाट बघत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
जगभर भीतीचे वातावरण -
ब्रिटन आणि युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. त्याचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवाही स्थगीत करण्यात आली आहे. कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असताना इंग्लंडमधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू आऊट ऑफ कंट्रोल असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी तेथील संसदेत सांगितले आहे.
हेही वाचा- 'नाताळ'च्या निमित्ताने सजल्या पालघरमधील बाजारपेठा; सजावटीच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल