मुंबई - कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना किमान एक वेळचे जेवण नीट मिळावे, म्हणून शिवभोजन थाळीचा दर पाच रुपये करण्यात आला होता. तोच दर पुढील मार्च महिन्यापर्यंत कायम राहील, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून पुढील 6 महिन्यांसाठी हा दर लागू राहील. जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोनामुळे मार्चपासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली. यामध्ये आम्ही सरकारकडून ४५ रुपये देतो आणि नागरिकांनी ५ रुपये द्यावयाचे असतात.
एकूण 906 शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण
राज्यात कोरोनाच्या काळात १ लाख ४५ हजार थाळ्या दिल्या जात होत्या, अलीकडे काही मागणी वाढली आहे. मात्र, गरज लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. सध्या एकूण 906 शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण होते. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 कोटी थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.