मुंबई - मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील गुजरातमधील हापा येथून रो-रो सेवेद्वारे तीन टॅंकर महाराष्ट्रासाठी रवाना झाले आहेत. या तीन टँकरद्वारे 44 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) कळंबोली येथे उद्या (दि. 26 एप्रिल) सकाळच्या सुमारास पोहोचणार आहेत. एकूण 860 कि.मी.चा प्रवास या वेळात केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेवर ऑक्सिजन एक्सप्रेस
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजच्या तुडवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाचा दुर्देवी मृत्यू होत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीसाठी पश्चिम रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणात येत आहेत. विशाखापट्टणममधून सात टॅंकर महाराष्ट्रात आणण्यात आल्यानंतर आता आणखीन तीन टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
सुरक्षेचे पूर्ण तयारी
रो-रो सेवेद्वारे एलएमओ आणताना विशेष काळजी घेण्यात आली आहे. रेल्वे मार्गावरील ओव्हर हेड वायर, पादचारी पूल यांचा अंदाज घेऊन रो-रो सेवेद्वारे टँकर चालविण्यात येत आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वेगवान हालचालीसाठी गुरुत्वाकर्षण आणि ऑक्सिजनची आवश्यकता पाहता मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. यासह विशेष खबरदारी म्हणून ऑक्सिजन दाबाचे निरीक्षण करणे, सुरक्षा बाबी तपासणे सुरू होते, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
अशी येणार ऑक्सिजन टँकर
तीन ऑक्सिजन टँकर गुजरात येथील हापा येथून रविवारी (दि. 25 एप्रिल) सांयकाळी 6.03 वाजता रवाना झाले आहेत. सोमवारी (दि. 26 एप्रिल) सकाळी कळंबोली येथे पोहोचणार आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेस 860 किमीचे अंतर पार करणार असून या टॅंकरमध्ये 44 टन ऑक्सिजन गॅस असणार आहे. ऑक्सिजन एक्सप्रेससाठी हापा येथील गुड्स शेडमध्ये कमी वेळेत तयारी करण्यात आली. ही एक्सप्रेस वीरामगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि वसईरोड, असा प्रवास करणार आहे. सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - हेही वाचा - राज्यात 66 हजार 191 नव्या रुग्णांची वाढ, 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त