मुंबई - फेसबुकद्वारे मैत्रीकरून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना नोएडा उत्तर प्रदेशातून मुंबई पोलिसांच्या पवई पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणात 84 वर्षीय पीडित तक्रारदाराला परदेशातून 1 लाख 30 हजार पौंड (40 लाख रुपये) पाठवत असून ते तुम्ही मुंबईतील गरीब कोविड रुग्णांसाठी खर्च करा. अशी बतावणी करून तब्बल 3 लाख 44 हजार रुपयांना बसविण्यात आले होते.
विविध टॅक्ससाठी २० लाख भरायला सांगितले -
मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुब्रमण्यम रामन या 84 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या मोबाईल फोन व फेसबुकद्वारे वेतन मेगण नावाची महिला लंडनमधून बोलत असल्याचे सांगितले. तिने तब्बल 1 लाख 30 हजार ब्रिटिश पौंड पाठवत असल्याचे सांगितले होते. सदरचे हे पैसे मुंबईतील गरीब कोविड रुग्णांवर खर्च करावे. असे तिचे म्हणणे होते. यादरम्यान सदरच्या महिलेवर विश्वास ठेवून सुब्रमण्यम यांनी यास होकार दिलेला होता. मात्र काही दिवसानंतर सदरचे पैसे पाठवण्यासाठी कस्टम क्लिअरन्स, इन्कम टॅक्ससाठी विविध खात्यांमध्ये 20 लाख 47 हजार 810 रुपये भरण्याची गरजेचे आहे. असे तक्रारदाराला वेगवेगळ्या खात्यांमध्ये सदरचे पैसे भरण्यास सांगितले होते.
बँक खाते उघडून देण्यासाठी देण्यात आले होते 40 हजार -
यानंतर आरोपीने सांगितल्यानुसार, तक्रारदार सुब्रमण्यम यांनी 3 लाख 44 हजार रुपये राहुल तिवारी नावाच्या इसमाच्या कॅनरा बँक नोएडा शाखेत जमा केले होते. मात्र यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवई पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असता राहुल तिवारी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी एचडीएफसी, कॅनरा, आयसीआयसीआय, इंडियन, युनियन, इंडियन ओव्हरसीज अशा 7 बँकांमध्ये शमशाद हुसेन या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्याने खाते उघडले होते. त्याबद्दल राहुल तिवारी यास 40 हजार रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी कबूल केले होते.
तिघांना अटक; 16 एटीएम कार्ड, 16 पासबुक इ. साहित्य जप्त -
या प्रकरणातील आरोपी हे वेगळ्या पद्धतीने गुन्हे करत होते. गुन्हा करण्यासाठी सदर आरोपी त्यांच्या परिचयातील 20 जणांना वेगवेगळ्या बँकेत खाते उघडण्यास सांगितले होते. सदर या व्यक्तींकडून त्यांच्या खात्याचे सर्व कीट व बँकेशी संलग्न असलेले मोबाईल क्रमांक विशिष्ट रक्कम देऊन विकत घेत होते. पोलिसांनी याप्रकरणी आसिफ वसीम खान, आसिफ शमशाद हुसेन व राहुल तिवारी या आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी 16 एटीएम कार्ड, 16 पासबुक, 6 चेक बुक, 2 आधार कार्ड, 4 मोबाईल हस्तगत केले आहेत. न्यायालयाने त्यांची रवानगी 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.