मुंबई - आज रात्री (22 एप्रिल) आठ वाजल्यापासून राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. हे निर्देश आजपासून संपूर्ण राज्यभर लागू असणार आहेत. मात्र त्याआधी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी लावण्यात आली. मात्र संचारबंदी लावल्यानंतरही रुग्ण संख्या काही कमी होताना दिसत नसल्याने, राज्य सरकारने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या संबंधीचे सूतोवाच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन घोषणा होण्याच्या दोन दिवस आधीच 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला होता.
14 एप्रिलला राज्यात संचारबंदी लावल्यानंतर मुख्यमंत्री तसेच राज्यातील जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी संचारबंदीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जावे, असे आवाहन केले होते. मात्र, राज्यात वाढणारी रुग्ण संख्या पाहता, नागरिकांकडून संचारबंदीच्या नियमाला हरताळ फासण्याचा चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे राज्य सरकारने आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिल ते 21 एप्रिल यादरम्यान राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आढळली नाही. तर रुग्ण संख्या वाढतानाच पाहायला मिळाली. नेमकी यादरम्यान च्या आकडेवारीवर एक नजर टाकुयात -
14 एप्रिल- रुग्ण संख्या 58 हजार 952, तर मृत्यू 278 राज्यात, एकूण ॲक्टिव रुग्णसंख्या सहा लाख 12 हजार 70
15 एप्रिल- रुग्ण संख्या 61 हजार 695, तर मृत्यू 349, 6 लाख दोन हजार साठ
16 एप्रिल- रुग्ण संख्या 63 हजार 729, मृत्यू 398, ॲक्टिव रुग्णसंख्या 6 लाख 38 हजार 34
17 एप्रिल- रुग्ण संख्या 67 हजार 123, मृत्यू 419, ॲक्टिव रुग्णसंख्या 6 लाख 47 हजार 933
18 एप्रिल- रुग्ण संख्या 68 हजार 631, मृत्यू 503, ॲक्टिव रुग्णसंख्या 6 लाख 70 हजार 388
19 एप्रिल- रुग्ण संख्या 58 हजार 924, मृत्यू 351, ॲक्टिव रुग्णसंख्या 6 लाख 67 हजार 520
20 एप्रिल- रुग्णसंख्या 62 हजार 97, मृत्यू 519, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या सहा लाख 83 हजार 856
21 एप्रिल- रुग्णसंख्या 67 हजार 468, मृत्यू 568, एकूण रुग्ण संख्या 6 लाख 95 हजार 747
या आठ दिवसात रुग्ण संख्या तसेच मृत्यूच्या संख्येवर नजर टाकली असता, आपल्या लक्षात येईल गेल्या आठ दिवसांमध्ये रुग्ण संख्या कमी झालेली नाही. याउलट या आठ दिवसांमध्ये जवळपास सरासरी आठ ते नऊ हजार रुग्ण वाढलेले आहेत. तर तिथेच मृत्यूची संख्या ही जवळपास दुप्पट झालेली आहे.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला गेला. यासोबतच रेमडेसिविरचे इंजेक्शन, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता या दिवसांमध्ये जाणू लागली. ही रुग्णांची आठ दिवसाची आकडेवारी पाहता मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी राज्यामध्ये कडक लॉकडाउन लावण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मंत्रिमंडळामध्ये केलेली मागणी आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी आज रात्री आठ वाजल्यापासून कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. या सोबतच त्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जवळजवळ दहा हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड नियम तोडणाऱ्या नागरिकांकडून वसूल केला जाईल, असा इशारा या नवीन नियमावलीनुसार देण्यात आलेला आहे.