मुंबई : बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यासोबतच बाबासाहेबांचे विचार पुस्तकरूपी ( Babasaheb thoughts in book ) आपल्या घरी घेऊन जाता यावेत याचाही प्रयत्न या अनुयांकडून दरवर्षी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर या दोन दिवशी चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या पुस्तकांचे स्टॉल लावले जातात. हजारो पुस्तक या दोन दिवसात विकली जातात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असलेल्या तृतीयपंथी लेखिका दिशा पिंकी शेख यांनीही या दोन दिवसासाठी पुस्तकांचा स्टॉल लावलेला आहे. 2016 पासून प्रत्येक महापरिनिर्वाणदिनी त्या या परिसरात स्टॉल लावत असतात.
महापरिनिर्वाणदिनी पुस्तकांचे दुकान : दिशा पिंकी शेख या लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेले कुरूप हे पुस्तक देखील त्यांनी आपल्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवले आहे. या पुस्तकातून त्यांनी आपल्या समाजाच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याची ताकद संविधानाच्या माध्यमातून दिली आहे. या ताकदीच्या जोरावरच तृतीयपंथी देखील आज समाजात उभा राहत आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात मांडले जाते असे लेखिका दिशा पिंकी शेख म्हणतात. तसेच 2016 पासून आपण महापरिनिर्वाणदिनी पुस्तकांचे दुकान लावत आलो आहोत. दरवर्षी वाचकांची संख्याही वाढत आहे. पुस्तकांची विक्री ही चांगली होते. स्वतः लिहिलेले कुरूप हे पुस्तक आपण विक्रीसाठी ठेवल असून, अजून एका पुस्तकाच्या लेखनावर आपले काम सुरू आहे. पुढच्या वर्षी ते देखील आपण विक्रीसाठी याच स्टॉलच्या माध्यमातून समोर आणू असेही दिशा पिंकी शेख बोलताना म्हणाल्या.