मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गैरव्यवहार प्रकरण एसीबी मार्फत चौकशीच्या रडारवर आहेत. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका नव्या प्रकरणाची यात भर पडली आहे. त्यामुळे लाचलुचपत खात्यांमार्फत या प्रकरणाचीही खुली चौकशी करावी, असे आदेश गृहविभागाने दिले आहेत. परमबीर सिंह यांच्या अडचणीत यामुळे वाढ झाली आहे.
पोलीस निरीक्षक घाडगेंचे आरोप -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी बेकायदा कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचा गंभीर आरोप पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी केला होता. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महासंचालक कार्यालयाला तसा १४ पानांचा पत्रव्यवहार केला होता. पोलीस आयुक्त असताना सिंह यांनी श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून वगळण्यासाठी दबाव टाकत असत, असा गंभीर आरोप घाडगे यांनी केला आहे. तसेच आर्थिक अनियमिततेच्या एका प्रकरणात तब्बल २२ सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांची नावे काढण्याचे आदेश दिल्याचा दावा घाडगे यांनी पत्रातून केला आहे. मात्र आदेशाला न जुमानल्याने चार खोटे गुन्हे दाखल करत निलंबित केल्याचेही घाडगे यांचे म्हणणे आहे. यासर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी घाडगे केली आहे. तसेच अकोल्यात गुन्हाही दाखल केला होता. ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
खुली चौकशी होणार -
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात आधीच एका प्रकरणात खुली चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्या आरोपावरून ही चौकशी केली जात आहे. निलंबित डांगे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणाची खुली चौकशी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मागणी केली होती. याबाबत प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्याने सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला खुली चौकशी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर यांच्याविरोधात कट रचणे, पुरावे नष्ट करणे, आणि अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्या चौकशीनंतर अनेक प्रकरणाचा उलगडा होणार आहे. मात्र माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंहांचा पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.