मुंबई - मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजर सुरू आहे. मुंबई महापालिकेकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असला तरी नव्याने निविदा काढताना घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर बोलताना आरोप करणाऱ्यांकडे दुसरे उद्योग नाहीत, नागरिकांचा जीव वाचवणे हेच आमचे लक्ष असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटले.
हेही वाचा - कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. काही प्रमाणात कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. मुंबई महापालिकेकडे कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा २२ हजारचा साठा आहे. इंजेक्शन कमी पडू नयेत म्हणून पालिकेने आणखी साठा मिळावा यासाठी निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या.
त्यांच्याकडे दुसरा उद्योग नाही
रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप करणाऱ्यांकडे दुसरे उद्योग नाहीत. ते विरोधक आहेत. त्यांचे विरोध करणे हे त्यांचे काम आहे. आमच्याकडे एकच निविदा होती. निविदा मागवल्यानंतर एकाच कंपनीने प्रतिसाद दिला. आमच्यासमोर लक्ष्य लोकांचे जीव वाचवण्याचे आहे. पैशांपेक्षा आमच्यासाठी जीव महत्वाचा आहे. इतर राज्यात ज्या दराने रेमडेसिवीर खरेदी केले जात आहे त्याच दराने महापालिका खरेदी करत असल्याचे महापौरांनी सांगितले.
काळाबाजार करणाऱ्यांना का वाचवता?
घाटकोपरमध्ये दर्पण मेडिकलमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू होता. या मेडिकलवर विरोधकांनी धाड टाकायची होती. मी तीथे गेले तेव्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत होतात? असा प्रश्न महापौरांनी विरोधकांना विचारला आहे. हे सगळे संकट काळात गोंधळ घालत आहेत. हे सर्व गोंधळी आहेत. यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे महापौरांनी म्हंटले.
हॉटेलमध्ये उपचार
मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेड कमी पडत आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने लक्षणे असलेल्या रुग्णांवर रुग्णालयात, तर लक्षणे नसलेल्या व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर हॉटेलमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने इंटरकॉन्टिनेंटल, ट्रायडंट हे दोन हॉटेल ताब्यात घेतले आहेत. या हॉटेलमध्ये बॉम्बे रुग्णालय, तसेच एच.एन रिलायन्स रुग्णालयाकडून उपचार केले जाणार आहेत. तसेच, इतर ठिकाणीही बेड वाढवले जात असल्याची माहिती महापौरांनी दिली.
बेड वाढवणार
बेड कमी पडू नये म्हणून जसलोक या खासगी रुग्णालयामधील 250 बेड ताब्यात घेतेले जाणार आहेत. त्यात 40 बेड आयसीयूचे आहेत. अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात 30 आयसीयू बेड वाढवले जाणार आहेत. गोरेगाव नेस्को येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये 1 हजार 500 बेड वाढवणार, त्यातील बहुतेक बेड हे ऑक्सिजनचे असल्याची माहिती महापौरांनी दिली.
हेही वाचा - देशांतर्गत विमान प्रवासात आजपासून खानपान सुविधा बंद