मुंबई - मुंबईमध्ये ( Dengue outbreak in Mumbai ) दरवर्षी विशेष करून पावसाळ्यात विशेष करून पावसाळी आजारांचे रुग्ण आढळून येतात. यंदा पावसाळा गेल्यानंतरही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत ( increase in dengue patients in Mumbai ) आहेत. मागील दोन वर्षापेक्षा यंदा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल ८४४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद ( Dengue patients ) झाली आहे.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, हेपेटायटिस, गॅस्ट्रो, स्वाईन फ्ल्यू, आदी आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्यापैकी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या दोन वर्षात वाढ होताना दिसली आहे. कोरोनाचा प्रसार असताना जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत डेंग्यूचे १२९ रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत त्यात वाढ होऊन ८७६ रुग्णांची नोंद झाली. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्यात डेंग्यूच्या ८४४ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील एका वर्षात जितक्या रुग्णांची नोंद झाली होती सुमारे तितक्याच रुग्णांची नोंद यंदा दहा महिन्यात झाली आहे.
डेंग्यूचे अधिक रुग्ण - मुंबई पालिकेचे मुंबई सेंट्रल येथे नायर रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या ओपीडीत रोज ५० हुन अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्या रक्त तपासण्या केल्या जातात. रक्त तपासणीचा अहवाल येण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन उपचार केले जातात. सर्वाधिक रुग्ण डेंग्यूचे असल्याचे समोर येत असून अनेकांना रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचा अहवाल नोंदवला गेला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर्स रुग्णांना ताप आणि प्लेटलेट्स वाढवण्याचे उपचार देत असल्याचे नायर रुग्णालयातील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. माला कनेरिया यांनी दिली.
सलमानलाही झाला होता डेंग्यू - सुप्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान याला मागील महिन्यात डेंग्यूची लागण झाली होती. यानंतर पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने सलमान खान राहत असलेल्या बांद्रा येथील गॅलॅक्सी इमारतीत तपासणी केली होती. त्यात सलमान खान याच्या घरी डेंग्यू पसरवू शकतील अशा अळ्या आढळून आलेल्या नव्हत्या. मात्र याच परिसरात तपासणी दरम्यान सहा ठिकाणी आळ्या आढळून आल्या. त्या आळ्या पालिकेने नष्ट केल्या होत्या. सलमान खानला पनवेल येथील फार्म हाऊसवर डेंग्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
४ वर्षात १३ जणांचा मृत्यू - २०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यू मुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूमुळे गेल्या ४ वर्षात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
डेंग्यूची अशी घ्या काळजी - डेंग्यू, मलेरिया आदी आजार हे मच्छर आणि डासांमुळे होतात. यासाठी रात्री झोपताना मच्छरदाणी वापरावी. मलेरिया डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाहीत याची नागरिकांनी काळजी घ्यावी. ताप, उलटी, जुलाब होत असल्यास पालिकेच्या हेल्थ पोस्ट, दवाखाने व रुग्णालये येथे मोफत तपासणी केली जाते. या ठिकाणी जाऊन नागरिकांनी उपचार करून घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी, आजारांकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाविभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केल आहे.