मुंबई - स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच एक प्रकार ब्युटी पार्लर व्यावसायिके सोबत घडला आहे. अंधेरी वर्सोवा येथे म्हाडातर्फे आमदारांसाठी बांधण्यात आलेल्या राजयोग इमारतीत 2 कोटीचे घर 60 लाखात मिळवून देते, असे सांगून एका महिलेने तब्बल 50 लाखांनी गंडवले आहे.
ब्युटी पार्लर व्यावसायिका रुपल जैन या एका महिलेला ओळखत होत्या. याच ओळखीचा फायदा घेत त्या महिलेने जैन यांचा विश्वास जिंकला. त्या महिलेने मी लाईजिग एंजट असून म्हाडाच्या घरांची विक्री करते असे जैन यांना सांगितले. शिवाय माझी अनेक वरिष्ठ नेत्यांशी चांगली ओळख असून 2 कोटी किंमतीची रूम 60 लाख रुपयाला मिळवून देते असे सांगितले. सन 2017 साली या महिलेने जैन यांच्याकडून 50 लाख रूपये घेतले. जेव्हा घराचा ताबा मागितला तेव्हा ती टाळाटाळ करू लागली. तेव्हा जैन यांना फसवणूक झाल्याचे कळले. जैन यांनी म्हाडा कार्यालय आणि पोलीस स्थानकात धाव घेतली. सामान्य माणसाची फसवणूक करण्याऱ्या अशा भामट्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जैन यांनी केली आहे.
म्हाडाचा या प्रकरणाशी संबंध नाही -
खोटे व्यवहार करणाऱ्या दलालांना जेरबंद करू, असे सांगणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाने मात्र या प्रकरणात आपले हात वर केले आहेत. हा त्यांचा खाजगी व्यवहार आहे. असे कोणी 50 लाख देत का ? आमचा या प्रकरणाशी संबंध जोडू नये, असे म्हाडा सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले आहे.