मुंबई - जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुळात हा रुग्ण अतिगंभीर परिस्थितीत अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आला. डॉक्टरांनी त्याला वेळीच उपचार करुन कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटिलेटर) दिला. मात्र, काही वेळाने तो रुग्ण दगावला. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत व्हेंटिलेटर सुरू करण्यास भाग पाडले. मात्र, नंतर इलैक्ट्रोकार्डियोग्राफी (इसीजी) काढल्यानंतर त्या रुग्णाचे हृदय बंद असल्याचे समोर आले व डॉक्टरांनी पुन्हा त्याला मृत घोषित केले.
मुंबईतील केईएम रुग्णालयात हा प्रकार घडला. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरला अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. एवढ्यावरच न थांबता ते त्या डॉक्टरच्या अंगावर धावून गेले. हा सर्व प्रकार एकाने चित्रीत करुन त्याची क्लिप विविध समाज माध्यमांवर व्हायरल केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इसीजी यंत्र डॉक्टर घेऊन येतात, त्यानंतरचा व्हिडिओ नाही. त्यामुळे सर्वत्र राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीत आलेल्या या व्हिडिओची शहानिशा केल्यानंतर हा व्हिडिओ केवळ अर्धसत्य असल्याचे समोर आले. व्हायरल व्हिडिओनंतरचे सत्य वेगळेच आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओतून राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, त्या व्हिडिओची सत्यता समोर आल्यानंतर वैद्यकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची काहीच चूक नसल्याचे निदर्शनास आले आहे. उलट ज्या रुग्णांच्या नातेवईकांनी जसा व्यवहार एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराशी केला आहे तो अत्यंत खालच्या प्रकारचा असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयातून व्यक्त होते आले.
हेही वाचा - 'एनसीबी'चे मुंबईत छापे; मात्र कुणालाही अटक नाही