मुंबई : 2013 पासून हाताने मैला सफाईवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही राम शंकर मौर्य यांनी हाताने घाण साफ केल्याची घटना समोर आली आहे. यावर राष्ट्रीय सफाई आयोगाचे अध्यक्ष वेंकटेश यांनी महाराष्ट्र शासनाने कामगाराला ४० हजारांची नुकसान भरपाई द्यावी; तसेच हाताने घाण साफ करण्याचे काम करायला लावणाऱ्या कंत्राटदाराला अटक करावी, अशी मागणी केली आहे.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी : मुंबईत उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गटारीमध्ये राम शंकर मौर्या हे घाण सफाईचे काम करीत होते. आयोगापर्यंत ही घटना 'ईटीव्ही भारत'ने कळवली. त्यानंतर या घटनेची आयोगाने दखल घेत कंत्राटदारावर करावाई करण्याची मागणी केली आहे. आयोगाचे अध्यक्ष वेंकटेशन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही सफाई कामगारांच्या कल्याणासाठीच मुंबईत आढावा घेण्यासाठी आलो होतो. त्याचदरम्यान ही घटना घडल्याचे आपल्याकडून समजले.
आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने त्या सफाई कामगाराला चाळीस हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे. ज्या कंत्राटदाराने रामशंकर मौर्या यांना हे काम करायला लावले, त्यांना अटक करावी - वेंकटेश, अध्यक्ष, राष्ट्रीय सफाई आयोग
पोटासाठी घाणीत उतरावे लागते : याबाबत राम शंकर मौर्या म्हणाले की, दारू पिल्याशिवाय या घाणीमध्ये उतरू शकत नाही. गळ्यापर्यंत घाण पाणी येईल इतक्या खोल गटारात आम्ही उतरतो. या गटारात अनेक प्रकारची घाण असते. कंत्राटदाराने काही प्रतिबंधात्मक कपडे किंवा बूट किंवा ऑक्सिजन सिलेंडर काही पुरवले का?'असे राम शंकर मौर्या यांना विचारले त्यावर ते म्हणाले की, " मला कोणतीही साधने मिळाली नाहीत. त्याबद्दल माला काहीच माहीत नाही, असे उत्तर राम शंकर मौर्या यांनी दिले. पोटाचा प्रश्न असल्यामुळे काम करावे लागते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
देशात 25 कामगारांचा गुदमरून मृत्यु : गटारीत उतरून घाण साफ करताना मुंबईतील दोन कामगारांचा तीन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तसेच औरंगाबाद शहरात देखील गटारीमध्ये काम करत असताना दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर, परभणी येथे 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या सर्व घटनेची नोंद राष्ट्रीय सफाई कामगारांच्या ताज्या अहवालामध्ये आहे. महाराष्ट्रातील सादिक रहीम शेख, जुनेद शेख, शाहरुख सादिक शेख, फिरोज गफार शेख, नावेद शेख यांचा 11 मे 2023 रोजी गटारीत घाण साफ करताना गुदमरून मृत्यू झाला आहे. तर देशामध्ये या सहा महिन्यात एकूण 25 सफाई कामगारांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली हरियाणा, राजस्थान ही राज्य सामील आहेत. दिल्लीत आप सरकारकडून हे काम बहुतांशी मशीनद्वारे केले जाते. त्यामुळे कामगारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र मुंबई शहरात या प्रकारचे मशीन असूनही कामगारांना गटारात उतरावेच लागते. हे मात्र चिंताजनक आहे.अशी प्रतिक्रिया कामगारांच्या संदर्भात अभ्यास करणारे राजू रोटे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनासाठी शरमेची बाब : याबाबत सफाई कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड मिलिंद रानडे म्हणाले की, ज्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. त्याच दिवशी भारताच्या सफाई कामगार आयोगाचे प्रमुख मुंबईत होते. व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली हाताने घाण साफ करणाऱ्या कामगारांच्या भविष्याबाबत बैठक सुरू होती. अशा घाणीत काम करण्यासाठी गरीबांनाच उतरावे लागते, ही शासनासाठी शरमेची बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.