मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दीड वर्षापूर्वी कोसळला होता. त्यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. लोखंडी पूल गंजण्याची शक्यता असल्याने याठिकाणी स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाचे घेतला आहे. हा पूल बांधण्यासाठी पालिका 7 कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या निविदा पुढच्या आठवड्यात काढल्या जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
धोकादायक पूल
14 मार्च, 2019 रोजी सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळला होता. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटने आधीच अंधेरी रेल्वे स्थानकावरील वाहतुकीचा गोखले पुलाचा काही भाग कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही दुर्घटनांमुळे पालिकेने मुंबईमधील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. या ऑडिटमध्ये ब्रिटिशकालीन अनेक पूल धोकादायक असल्याचे समोर आले. धोकादायक पुलांपैकी काही पूल पालिकेने पाडले. त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सहा महिन्यात पूल बांधणार
पुलावरील वजन वाढल्याने हिमालय कोसळला असे निरीक्षण नोंदवल्यात आल्याने हा पूल लोखंडी न बांधता स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाचे घेतला आहे.स्टेनलेस स्टीलच्या पुलामुळे भविष्यात पुलाला गंज पकडण्याचा धोका टळणार आहे. पूल बांधण्याबाबत पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच काम सुरू करण्यात येणार असून पुढील सहा महिन्यांत पूल पादचाऱ्यांना वापरासाठी खुला करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पूल विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र कुमार तळकर यांनी दिली.
पावसाळ्यापूर्वी इतर पुलांचे काम
मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव मुंबईत झाल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना विरोधात लढा देत आहे. पूल विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाला हरवण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटसमयी मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेत धोकादायक पुलांचे काम सुरू ठेवले असून अनेक पुलांचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी पुलांचे काम पूर्ण करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.
हँकॉक ब्रीज मे अखेरपर्यंत होणार खुला
धोकादायक ठरल्याने 2016 मध्ये 125 वर्षे जुना हॅंकाॅक पूल पाडण्यात आला. त्यानंतर परवानग्याच्या अडचणीत पुलाचे काम धीम्या गतीने सुरू होते. परंतु माझगाव, भायखळा परिसरातील लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुलाचे काम हाती घेत 650 मेट्रीक टनाच्या गर्डरचा एक भाग टाकण्यात आला असून दुसरा गर्डर जानेवारीपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हँकॉक पुलाचे काम मेपर्यंत पूर्ण होणार असून मे अखेरपर्यत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - विना मास्क फिरणार्या ४ लाख ८५ हजार नागरिकांवर कारवाई; १० कोटी ७ लाखाचा दंड वसूल
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात आज ५ हजार ५४४ नव्या रुग्णांचे निदान; ८५ रुग्णांचा मृत्यू