मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा अधिकृतरित्या शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
'केंद्राला यापूर्वीच सूचना सुचवल्या'
कोरोनाची सध्याची परिस्थिती, वेगवेगळ्या आजारांचे मुलांवर होणारे परिणाम पाहता विद्यार्थ्यांच्या मनात तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यासंबधीचा अधिकृतरित्या शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेनंतर सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने, परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
निकाल कसा लावणार?
बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बारावीचे 14 लाख विद्यार्थी कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून दूर राहणार आहेत. सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकनाचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शालेय शिक्षण मंत्र्यांनी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषीत करण्याच्या सूचना केंद्र सरकारला पाठवल्या आहेत. त्यामुळे आता निकलाबाबाद केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्यावर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल लावण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.