मुंबई - शहरात गणेशोत्सवासाठी फक्त एक हजार मंडळांनाच आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या वाजत गाजत साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीसाठी पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, मंडप उभारण्याच्या परवानगीसाठी मंडळांकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत गणेशोत्सव साजरा करणारी ११ हजार मंडळे आहेत. त्यापैकी २६२० मंडळांनी मंडपासाठी अर्ज केले असून, आतापर्यंत फक्त १ हजार मंडळांनाच परवानगी मिळाली आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही परवानगी न घेताच गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दोन वर्षापासून मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन परवानगी दिली जाते. त्यामुळे मंडळांना रांगा लावण्यात जाणारा वेळ वाचतो आहे. मंडळांना परवानगी मिळवण्यात अडचण येऊ नये यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाकडून नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. या यंत्रणा प्रशासनाबरोबर समन्वय ठेवणार आहेत. मुंबईत सुमारे ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त हजार २६२० मंडळांनीच पालिकेकडे अर्ज केले असून, १ हजार मंडळांना मंडपासाठी परवानग्या मिळाल्या आहेत.
१९ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत आहे. पालिकेकडे येणा-या अर्जांचा वेग कमी असल्याने उरलेल्या १५ दिवसांत सुमारे १० हजार मंडळांना परवानग्या द्याव्या लागणार आहेत. ही मुदत कमी असून सर्व मंडळांना परवानग्या मिळायला हव्यात यासाठी मुदत वाढण्याची मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे मंडळांनी केली होती. महाडेश्वर यांनी मुदत वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार २४ ऑगस्टपर्यंत आणखी पाच दिवसांची मुदत प्रशासनाकडून वाढवण्यात आली आहे. मंडळांना आपापल्या विभाग कार्यालयात मंडप परवानगीसाठी अर्ज करता येत आहे.
अर्ज केल्यानंतर संबंधित विभाग कार्यालयाकडून पोलीस, ट्रॅफिक विभागाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मंडळांना परवानग्या दिल्या जात आहेत. मुदत वाढवण्यात आली असली तरी पुढील ८ दिवसांत मंडळांना अर्ज करून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कमी वेळांत परवानग्यांसाठी मंडळांची धावपळ उडणार आहे. परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा बृहन्मुंबई महापालिकेच्या www.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
परवानग्यांची सद्य स्थिती
- एकूण मंडळे - ११ हजार
- आलेले एकूण अर्ज - २६२०
- छाननी पूर्ण - २१९८
- परवानगी दिल्या - १००५
- परवानगी नाकारल्या - १८९
- कार्यवाही सुरू - १००४