मुंबई : सामना हे ठाकरे गटाचे मुखपत्र आहे. देशातील सध्यस्थितीवर सामनाच्या अग्रलेखांमधून नेहमीच परखडपणे भाष्य केले जाते. गरिबी आणि दारिद्र्य हा समस्त मानवजातीला लागलेला कलंक आहे. विपन्नावस्थेचा हा शाप हिंदुस्तानच्या पाचवीला पुजलेला आहे. एखाद्या कुटुंबावर कमालीचे दारिद्र्य ओढवले असेल, तर ती गरिबी त्या माणसाला काय करायला लावेल याचा काही नियम नाही. एकीकडे जागतिक क्षितिजावर हिंदुस्थानचे मान आता कशी ताठ झाली आहे, असे दिंडोरा देशातील राज्यकर्ते पिटतात. स्वतःची पाठ थोपटून घेतात. मात्र गरिबीमुळे हृदय पिळवटून टाकणाऱ्या करुण कहाण्या जेव्हा समोर येतात, तेव्हा संपूर्ण देशवासीयांची मान शरमेने खाली झुकते, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
गरिबीमुळे बाळाचा मृतदेह पिशवीतून : पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये धक्कादायक घटना घडल्याची बाब समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या कालियागंज भागात राहणाऱ्या आशिम देबशर्मा या गरीब व्यक्तीचा पाच वर्षीय मुलगा आजारी पडल्याने त्याला उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारानंतर दाखल केले. पदरमोड आणि उसनवार करून उपचारासाठी जमवलेले 16 हजार रुपये आठवड्याभरात या मुलाच्या औषध पाण्यावर खर्च झाले. सोबत आणलेले पैसेही संपले आणि शनिवारी रात्री या बाळाचा मृत्यू झाला. 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या कालियागंजला परत जायचे कसे आणि बाळाचा मृतदेह गावी न्यायचा कसा प्रश्न या गरीब तिच्या पुढे उभा राहिला. सरकारी नियमानुसार 102 आकडा डायल केल्यानंतर मोफत रुग्णवाहिकेची सुविधा मिळते. केवळ उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णापुरतीच ही सुविधा मर्यादित आहे.
राजकीय चिखलफेक सुरू : मरण पावलेल्या रुग्णांचे शव वाहून नेण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध नाही. मृतदेह गावी घेऊन जायचे असल्यास आठ हजारांचा खर्च येईल, असे रुग्णवाहिकेच्या चालकाकडून सांगण्यात आले. शववाहीकेचा नाद सोडून मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसने गावाकडे नेण्याचा निर्णय घेतला. पाच महिन्याच्या बाळाचा मृतदेह एका पिशवीत टाकला, अन्य प्रवाशांना दिसणार नाही याची काळजी घेत, त्यांनी सिलिगुडी ते कालियागंज असा प्रवास केला. ही बाब पश्चिम बंगालमध्ये समोर आल्यानंतर राजकीय चिखलफेक सुरू झाला आहे. प्रत्येक संवेदनशील मनातून केवळ आक्रदणाचे हुंदके उमटणे अपेक्षित असताना, राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. एकीकडे जागतिक महासत्ता होण्याच्या आपण बाता मारतो. आर्थिक महासत्ता होणार असल्याच्या गमजा मारतो आणि दुसरीकडे देशातील गोरगरीब कुटुंबांचे गरिबी बरोबरच आरोग्य यंत्रणांची दुरावस्था, सरकारी अनास्था आणि गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे, असे दैनिक सामनाच्या अग्रलेखात नमूद आहे.
गरिबीचा कलंक : पश्चिम बंगाल, बिहार किंवा उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अशा घटना घडतात, असे नव्हे तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात ही अशा घटना वाढल्या आहेत. मुरबाड येथे सरपंच आणि जावई, पालघर जिल्ह्यातील मोखाडा प्रसूत दोन अर्भक, पालघर जिल्ह्यातील धर्मीचा पाडा येथे आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गरोदर महिला आणि बाळाचा मृत्यू झाला होता. नाशिक, बीड जिल्ह्यातील नदी प्रवासाचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले होते. मेळघाटात वगैरे आदिवासी भागात कुपोषणामुळे होणारे बाल मृत्यू आपण आजही थांबू शकलो नाही. गरीबी बरोबरच आरोग्य यंत्रणा, दळणवळण व्यवस्था आणि सरकारी अनास्थेमुळे हकनाक बळी जात आहेत. दुर्गम भागातील परिस्थिती भयानक आहे. हजारो अब्जा देशांच्या श्रीमंत देशातील गरिबीचे हे चित्र मन विषन्न करणारे आहे. आपल्याच देश बांधवांवर गरीबीमुळे उडवलेली ही वेळ म्हणजे राजकारण चिवड्याची नव्हे तर राष्ट्रीय शरमेची गोष्ट आहे गरिबीचा शाप आणि कलंका मुळे हे घडले आहे. श्रीमंतांसमोर मुजरे करणारे राज्यकर्ते, धोरणकर्ते गरिबीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी काय करतील,असा सवाल दैनिक सामनातून केंद्र आणि राज्य सरकारला करण्यात आला आहे.