मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चालत आहे. एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी एसटी महामंडळामार्फत आता इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने सुमारे 5130 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच दिली होती; मात्र त्यानंतर अद्यापही काही कारवाई झाली नव्हती.अखेरीस आता एसटी महामंडळातर्फे 5150 वातानुकुलित इलेक्ट्रिक बस गाड्या खरेदी करण्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
कुणाला मिळाले टेंडर? - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संचालक मंडळाने इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली असून या बसगाड्या खरेदी करण्यासाठी 'एशियन डेव्हलपमेंट बँके'कडून कर्ज घेण्यासही राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यानुसार महामंडळाने 5150 गाड्यांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली होती. त्यात 'ओलेक्ट्रा ग्रीन टेक इवे ट्रान्स' या कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे.
काय असतील गाडीची वैशिष्ट्ये? - एस टी महामंडळाने काढलेल्या टेंडरनुसार बारा मीटर लांबीच्या 2800 गाड्या आणि नऊ मीटर लांबीच्या 2350 बसेस अशा दोन प्रकारात या वातानुकूलित एसटी गाड्या उपलब्ध होणार आहेत. बारा मीटरच्या बसेसची आसनक्षमता 44 प्रवाशांची असणार आहे. नऊ मीटरच्या बसेसची आसन क्षमता 32 प्रवाशांची असणार आहे. या सर्व गाड्या 'ई-बसेस' या श्रेणीतील असणार आहेत. या गाड्या गावातल्या गावात चालवण्याऐवजी दोन मोठ्या शहरांमध्ये चालवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
या वैशिष्ट्यांसह धावणार बसेस : या गाड्या पूर्णतः प्रदूषण विरहित आणि पर्यावरण पूरक असतील. या गाड्या आवाज विरहीतही असतील. या बसेसची रंगसंगती अतिशय सुंदर असून या गाड्या एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे तीनशे किलोमीटर अंतर धावू शकतात. तर गाडीची बॅटरी चार्ज करण्यासाठी सुमारे चार तासांचा अवधी आवश्यक असतो. या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे फ्रंट आणि रियर सस्पेन्शन आरामदायक सीट्स डिस्क ब्रेक इत्यादी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्या मार्गावर धावतात बसेस : या 5150 गाड्यांपैकी 150 गाड्या 2023 मध्ये तर उर्वरित 5 हजार गाड्या 2024 अखेरपर्यंत राज्य सरकारच्या महामंडळाच्या ताब्यात दाखल होतील, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अशाही बसेस चालत असून पुणे-मुंबई बेस्ट, तेलंगाना, गोवा, डेहराडून, सुरत, आमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर अशा ठिकाणी या बसेस धावताना दिसत आहेत. त्यामुळे लवकरच एसटी महामंडळातसुद्धा त्या दिसतील असा दावा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.