मुंबई - सकिनाका येथील शिवनेर विद्यामंदिर हायस्कूल या शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. गेली दोन महिने शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग चेंबूर यांच्याकडे चौकशी करूनही संस्थेने तीन महिन्यांचे वेतन दिले नसल्यामुळे शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण निरीक्षक कार्यालय उत्तर विभाग चेंबूर येथे बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.
सकिनाका येथील शिवनेर संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन सुरळीत मिळावे याबाबत शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण निरीक्षकांना पत्र दिले आहे, असे जालिंदर सरोदे यांनी सांगितले. गेली तीन महिने सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार पगार मिळाला नाही .शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण निरीक्षक संस्थाचालकांना पत्र देत आहेत. पण, संस्था मान्य करीत नाही. पगार थकल्याने शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. जोवर आम्हाला पगार मिळणार नाही, तोवर हे आंदोलन असेच चालू राहणार, असे जालिंदर सरोदे म्हणाले.