मुंबई - चहा म्हणजे मुंबईकरांसाठी जीव की प्राण आहे. चहासाठी मुंबईकर कितीही व्यस्त असले तरी वेळ काढतात. दादर सांस्कृतिक मंचाच्या वतीने आज जागतिक चहा दिनानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात चहा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या चहा प्रेमींनी समुद्रकिनारी चहाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती.
वेलचीयुक्त, आलेयुक्त, मसाला, चॉकलेट अशा विविध प्रकारच्या चहांनी यावेळी उपस्थितांना भुरळ घातली. त्याचबरोबर शेव पुरी, भजी, चायनीज भेळ असे लज्जतदार पदार्थदेखील या महोत्सवात उपलब्ध होते.
एक चहा असतो आईच्या हातचा तिच्या वात्सल्याचा
एक चहा असतो बहिणीच्या हातचा जिभेला चुरचुरेल इतका गरम असलेला
एक चहा असतो कॉलेजच्या कट्ट्यावरचा सोनेरी क्षणांची वेलची घातलेला
या चहाचे वर्णन करणाऱ्या विनय शिर्के यांच्या कवितेने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा - मराठमोळ्या 'दंगल गर्ल'चा गाव ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनोखा प्रवास
दादर सांस्कृतिक मंचाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा, जागतिक चहा दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या अशा चहा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे, संस्थेच्या अध्यक्षा उत्तरा मोने यांनी यावेळी सांगितले.