मुंबई - गेल्या 5 वर्षांत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, पण टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ झाली नाही. म्हणून येत्या 15 दिवसांत टॅक्सी भाडेवाढीबाबत निर्णय न झाल्यास संप पुकारण्यात येईल, असा इशारा टॅक्सीमन युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनी दिला आहे. दीड किलोमीटरसाठी किमान 30 रुपये भाडेवाढ करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करण्यात आले आहे.
3 एप्रिल 2019 रोजी 1 रुपया 96 पैशांनी सीएनजीत वाढ झाली आहे. त्यासोबत पाचवेळा सीएनजीची भाडेवाढ झाली. गाडीची देखभाल, इन्शुरन्स यामध्येही वाढ झाली. दिवसेंदिवस टॅक्सी चालकांच्या याचा खिशाला फटका बसत आहे. 2013 मध्ये किमान टॅक्सी भाडे 21 ते 22 रूपये होते. पण 2013 पासून आजपर्यंत एकही रूपयांची भाडेवाढ झाली नाही.
एकूणच सर्व वाढलेला खर्च पाहता किमान 30 रुपये दीड किलोमीटर एवढे भाडेवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे.
रिक्षा टॅक्सी भाडेवाढीसाठी नेमण्यात आलेल्या खटूआ समितीनेही 2017 ला एक रुपया भाडेवाढीची शिफारस केली आहे. मात्र, अद्याप त्याचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिवहनमंत्री रावते यांनी टॅक्सी चालकांच्या या मागणीकडे लक्ष देऊन भाडेवाढ करावी. अन्यथा येत्या 15 दिवसांत निर्णय न झाल्यास संप पुकारण्यात येईल आणि विनाकारण मुंबईकर वेठीस धरले जातील, असे क्वाड्रोस यांनी सांगितले.