मुंबई - केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) च्या निर्णयानुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सुट्ट्या मिठाईच्या ट्रे आणि कंटेनरवर 'बेस्ट बिफोर' अर्थात किती दिवसापर्यंत मिठाई खाता येईल हे नमूद करणे मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. तेव्हा जर कुणी विक्रेता या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)च्या निदर्शनास आले वा अशा तक्रारी आल्या तर ही बाब विक्रेत्यांना महागात पडणार आहे. कारण आता या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीसाठी एफडीएने कंबर कसली आहे. आता मुंबईतील मिठाई विक्रेत्यांवर एफडीएचा वॉच असणार आहे. तर या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असून त्यांना दोन लाखांचा दंड वा लायसन्स रद्द करण्यासारख्या शिक्षेला समोरे जावे लागेल अशी माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे.
अबालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच मिठाई आवडते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर मिठाईची विक्री होते. त्यात सुट्टी मिठाई मोठ्या संख्येने विकली जाते. मात्र ही सुट्टी मिठाई विकताना ती कधी बनवली आणि तिचे किती तासात किंवा किती दिवसांत सेवन करावे हे कधीही, कुठेही नमूद केले जात नव्हते. त्यामुळे अनेकदा शिळी किंवा खराब झालेली मिठाई विकली जाते. तर अशा मिठाईचे सेवन केल्यास अन्नबाधा, उलटी, जुलाब, पोटदुखीसारखे दुष्परिणाम होतात. हीच बाब लक्षात घेत आता एफएसएसएआयने सुट्ट्या मिठाईच्या विक्रीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता सुट्टी मिठाई विकताना मिठाईच्या ट्रेवर स्पष्ट दिसेल अशा शब्दात किती दिवसात मिठाई खावी हे नमूद करावे लागणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला 1 ऑगस्टपासुन देशभरात सुरुवात झाली आहे. पण महाराष्ट्रात मात्र याला विरोध झाला. या निर्णयाविरोधात मिठाई विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हा निर्णय जाचक असल्याचे सांगत तो रद्द करण्याची मागणी केली. पण न्यायालयाने मात्र हा निर्णय जनहितार्थच असल्याचे सांगत विक्रेत्यांची याचिका फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे तर त्यांना 1 लाखांचा दंड आकारत दणकाही दिला आहे. आता न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने मुंबईत या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती केकरे यांनी दिली.
मुंबईत जवळपास 800 नोंदणीकृत मिठाई विक्रेते आहेत. या सर्व मिठाई विक्रेत्यांवर, दुकानांवर आमची नजर राहणार आहे. आमचे अन्न सुरक्षा अधिकारी दुकानांची पाहणी करत नियमांचे पालन होत आहे का, ट्रे-कंटेनरवर 'बेस्ट बिफोर' नोंद आहे का? याची तपासणी करणार आहेत. या तपासणीत जे कुणी दोषी आढळतील त्याच्याविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. आधी दोषी विक्रेत्याला 15 दिवसाची नोटीस देत संबंधित सुधारणा करण्याचे आदेश देण्यात येतील. त्यानुसार 15 दिवसांनी पुन्हा तपासणी करण्यात येईल. यावेळी जर सुधारणा झाली नसेल तर मग त्याला दोन लाख रुपये दंड आकारण्यात येईल. अन्यथा त्याचा परवाना रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मिठाई विक्रेत्यांची जबाबदारी वाढली आहे. तर ग्राहकांनीही सुट्टी मिठाई खरेदी करताना 'बेस्ट बिफोर' तारीख तपासूनच खरेदी करावी असेही आवाहनही त्यांनी केले.