मुंबई - एकीकडे सीबीआयचा तपास सुरू असताना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन बाबी समोर येत आहेत. तर दुसरीकडे भाजपाने हे प्रकरण लावून धरले आहे. 'ड्रग, पब अँड पार्टी' गँगने सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्व तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. त्यात रोज नवीन माहिती बाहेर येत आहे. विरोधी पक्ष भाजपाने तर महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आज पुन्हा भाजपा नेते आशिष शेलार यांनी ड्रग, पब अँड पार्टी गँगने सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हटलं आशिष शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं -
नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच "ड्रग, पब अँड पार्टी" गँगने सुशांतसिंह राजपूतचा बळी घेतला. या 'ड्रग, पब पार्टी' गँगचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? ईडी आणि सीबीआय सत्य समोर आणतं आहे. खरे चेहरे ही समोर येतीलच आणि न्याय होईल, असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विट म्हटलं आहे.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीचीही वारंवार चौकशी होत आहे. या दरम्यान, रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत माध्यमांचा त्रास होत असल्याचे सांगितले आहे. माध्यमांच्या त्रासापासून वाचण्यासाठी तिने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. तिने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
हेही वाचा - सुशांत प्रकरण : दिल्लीतून नार्कोटिक्स नियंत्रण पथक मुंबईत दाखल
हेही वाचा - रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पोलीस ईडी कार्यालयात घेऊन गेले