मुंबई : मुंबई (Mumbai Municipal Corporation) हे जागतिक दर्जाचे शहर आहे. या शहरातील नागरिक सतत कामानिमित्त धावपळ करत असतात. त्यांचे रोजच्या धावपळीमुळे जेवणाकडे तसेच व्यायामाकडे नेहमीच दुर्लसख झालेले असते. या कारणाने मुंबईमधील नागरिक विविध आजारांनी त्रस्त असतात. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे. त्यानंतर पालिकेने नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात (Survey Started By Municipality)केली. सर्वेक्षण करून नागरिकांना नेमकं कोणते आजार आहेत, शहरात सर्वाधिक कोणत्या आजाराचे रुग्ण आहेत याची माहिती (get information Mumbaikars diseases) मिळवली जात असून; त्यानुसार औषध उपचार केले जात आहेत.
मागील सर्वेक्षणातून काय समोर आले : ३० वर्षांवरील व्यक्तिंचे आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यासाठी ऑगस्ट २०२२ पासून १५ रुग्णालयांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहासाठी असंसर्गजन्य आजार केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. त्याद्वारे आत्तापर्यंत ७८ हजार ६९८ जणांची या केंद्रांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ११.१० टक्के रक्तदाबाचे तर १०.८६ टक्के मधुमेहाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजारांची लागण असल्याचा संशय असलेले सुमारे ४.१८ टक्के नागरिक आढळले असल्याची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, महानगरपालिकेचा ए विभाग, जी-उत्तर विभाग, आर- दक्षिण या ३ विभागांमध्ये प्रायोगिक स्वरुपात लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण अंतर्गत एकूण २ हजार १५७ व्यक्तिंची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये देखील ४.८२ टक्के मधुमेहाचे, ५.४२ टक्के उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेह व रक्तदाब असे दोन्ही आजार असलेले ३.१५ टक्के संशयित रुग्ण आढळले आहेत.
नव्याने सर्वेक्षण सुरु : आरोग्य चाचण्या आणि प्रायोगिक स्वरुपातील सर्वेक्षण लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह व पक्षाघात नियंत्रण आणि प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षे वयावरील व्यक्तींचे उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात येतील. हे सर्वेक्षण ६७ आरोग्य केंद्रांमध्ये सुरु करण्यात आले आहे. दर आठवड्याला बुधवारी हे सर्वेक्षण नियमितपणे राबविले जात आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित आरोग्य केंद्रांमध्येही देखील सर्वेक्षण केले जाणार आहे.
निरोगी दैनंदिन जीवनशैली स्वीकारा : या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्था यांनी पाठिंबा द्यावा, तसेच महानगरपालिकेच्या नजीकच्या दवाखान्यांमध्ये अथवा आपल्या खासगी डॉक्टरांकडे जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच रक्तदाब तपासण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, या आजारांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी दैनंदिन जीवन निरोगी राखावे, पुरेसा व पोषक आहार घ्यावा, पुरेशा शारीरिक हालचालींद्वारे निरोगी अशी दैनंदिन जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
१४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह : चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे.