मुंबई Sunil Tatkare On Prithviraj Chavan : 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडलं. आपण घेतलेल्या काही निर्णयामुळं राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडलं. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. अन्यथा हा प्रश्न तेव्हाच सुटला असता, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या कार्यशैलीवर जोरदार आक्षेप नोंदवलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊनच पृथ्वीराज चव्हाण आले : केंद्राकडून महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊनच पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले होते. त्यांनी प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला वैरी मानलं. त्यामुळं राज्यातल्या आघाडी सरकारचा कारभार नीट चालला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यामुळं अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना भेटून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही : तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली होती. शिंदे समितीने आपला अहवाल दिल्यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय उच्च न्यायालयात टिकला नाही. यामध्ये सत्ता गेल्यामुळे ते टिकले नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे ते टिकले नाही हे बोलण्याचा त्यांचा काय हेतू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना आपण ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानत होतो. मात्र ते अलीकडे असे विनोद का करतात हे कळत नाही, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.
काँग्रेसने राष्ट्रवादीला गाफील ठेवत उमेदवार जाहीर केले : निवडणूक पूर्व आघाडी एखाद्या पक्षांमध्ये होत असेल तर दोन्ही पक्षांच्या विचाराने एकत्र निर्णय घेऊन उमेदवार जाहीर केले जातात. मात्र काँग्रेसने त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला गाफील ठेवून राष्ट्रवादी कोणत्या जागा लढवणार याची माहिती घेऊन त्या जागांवरील उमेदवार जाहीर केले. जर निवडणूक पूर्व आघाडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला वैरी मानून जर काँग्रेस निर्णय घेत असेल तर, एकत्र काम करण्यात आणि सत्तेला चिकटून राहण्यात अर्थ नाही. हे स्पष्ट झाल्यानंतर सत्तेतून बाहेर पडण्याचा आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी पाण्यात बघणे, वैरी मानणे हेच काम पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. मात्र, यामुळे त्यांच्या पक्षाची ही वाताहत झाली आणि त्यामुळं आज राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट(राष्ट्रवादी)
तत्कालीन मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या भूमिकेत : या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांचे हे वक्तव्य अत्यंत हस्यास्पद आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राज्यात काम करायला सुरुवात केली. ते सरकारमध्ये असून सुद्धा विरोधी पक्षाचे नेते असल्यासारखे काम करत होते. म्हणूनच शरद पवार यांनी त्यांच्या हाताला लकवा मारला असं विधान केलं होतं. राज्याच्या हिताचे निर्णय घेताना त्यांनी अनेक गोष्टी केल्या नाहीत, असं चव्हाण यांनी म्हटलंय.
पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया आघाडीचा विचार करावा : पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. एकीकडे राज्यात आणि देशात इंडिया नावाची आघाडी आकार घेत असताना, दोन घटक पक्षांमधील किंवा मित्र पक्षांमधील दरी वाढवण्याचे काम कोणी करू नये. तत्कालीन सरकारमध्ये असलेले अनेक दिग्गज मंत्री आणि नेते आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाहीत. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाची उत्तरे तेच देऊ शकतील. वास्तविक आपला मुख्य शत्रू वेगळा आहे. आपल्याला इंडिया आघाडी भक्कम करायची आहे. महाविकास आघाडी भक्कम करायची आहे. त्यामुळं आपल्यातले जे काही घटक होते, ज्यांच्यामुळे आरोप होत होते, ज्यांच्यामुळे सरकारला काही अडचणी आल्या ते लोक आता आपल्यात नाहीत.
हेही वाचा -
- NCP Disqualification Case : मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्या अपात्रतेसाठी अजित पवार गटाची याचिका
- MahaYuti Vs INDIA : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी 'महायुती'ची मुंबईत बैठक? तारखा एकच...
- Ajit Pawar News : पक्ष मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचा 'धडाका' ; पक्षातील मंत्र्यांवर आहे 'या' जिल्ह्यांची जबाबदारी