मुंबई - पवई येथील हिरानंदानी परिसरातील नोरीटा बिल्डिंगच्या १९ व्या मजल्यावरून एका महिलेने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. हिरानंदानीतील नोरिटा इमारतीत सकाळी १० च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला पार्किंग मध्ये काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. तिकडे जावून पाहिले असता एक महिला जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडली होती. सुरक्षा रक्षकाने महिलेला ओळखले. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राहणाऱ्या भट्टाचार्य परिवारातील ही महिला होती. मृदुला भट्टाचार्य असे या महिलेचे नाव आहे. यानंतर सुरक्षा रक्षकाने परिवाराला याबाबत माहिती दिली. १९ व्या मजल्यावर भट्टाचार्य यांचे दोन घरे आहेत. परिवारातील सर्व सदस्य सकाळी झोपेत असतानाच हा प्रकार घडला.
मृदुला भट्टाचार्य स्वतः डॉक्टर असल्याची माहिती मिळाली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आजारपणामुळे गेली अनेक दिवस त्या मानसिक तणावामुळे नैराश्यात होत्या. या तणावातून बाहेर काढण्यासाठी अलाहाबादवरून त्यांच्या मुलाने त्यांना मुंबईत आणले होते. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचारही सुरु होते. अशी माहिती नातेवाईकांनी पवई पोलिसांना दिली. त्यांना कोणता आजार होता ही माहिती अद्याप उघड झाली नाही. याबाबतचा अधिक तपास पवई पोलिस करत आहेत