मुंबई - परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने साडेआठ महिन्याच्या मुलीची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. इप्सा नावाच्या या बाळाचे वजन शस्त्रक्रियेच्या वेळी ४.७ किलोग्रॅम होते. ही सर्वांत कमी वजनाच्या रुग्णावरील यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे. मावशी कृपाली हिने इप्साला यकृतदान केले आहे.
सुरत येथे राहणाऱ्या इप्सा कृणाल वलवी या मुलीला जन्म झाल्यानंतर कावीळीची लागण झाली होती. तिला दुर्मिळ आढळणारा बायलिअरी अट्रेशिया (बीए) विकार झाल्याचे तपासणीत समोर आले. इप्साची प्रकृती सातत्याने ढासळत चालल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. अशा परिस्थितीत विकाराचे निदान ९० दिवसांच्या आत झाल्यास शस्त्रक्रियेचा पर्याय वापरता येतो. मात्र, इप्साच्या बाबतीत जन्माला तीन महिने उलटून गेल्यानंतर निदान झाले. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता.
हेही वाचा - मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी? देवरा अन् निरुपमांनी पक्षाच्या आंदोलनाकडे फिरवली पाठ
दर २००० बालकांपैकी एका मुलात हा आजार आढळतो. इप्साच्या केसमध्ये तिचे वय ९० दिवसांहून अधिक झाल्यानंतर या अवस्थेचे निदान झाले. त्यामुळे बीएसाठी केली जाणारी व यकृत प्रत्यारोपणाला पर्याय असलेली प्रक्रिया करणे कठीण होते. यकृताचे प्रत्यारोपण करणे हा बाळाला वाचवण्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव पर्याय होता, असे यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. अनुराग श्रीमाळ यांनी सांगितले.
मी एका सुंदर मुलीला जन्म दिला हे मला समजले तेव्हा खूप आनंद झाला होता. मात्र, बाळाला कावीळ झाली आणि तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. ग्लोबल हॉस्पिटलने आम्हाला आशेचा किरण दाखवला आणि इस्पाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले, असे इप्साची आई सुचित्रा वलवी यांनी सांगितले.
काय आहे बायलिअरी अट्रेशिया?
या अवस्थेमध्ये जन्मत:च बाळाच्या यकृतात पित्तवाहिन्या (बायलरी डक्ट्स) नसतात. त्यामुळे पित्त यकृतात साठून राहते. यकृताचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.