मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर नागपूर खंडपीठाने आक्षेप घेतल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. तो सुटावा यासाठी मराठी क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेण्यात आली. जर 250 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सुटला नाही तर सर्व प्रवेश प्रक्रिया तात्काळ थांबवावी. या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने वैद्यकीय शिक्षण उप संचालकांना अल्टीमेटम दिला आहे. लकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया थांबवावी. मराठा विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया जाणार नाही, यासाठी राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा आंदोलकानी आज दिला.
हा निर्णय संचालकांच्या हाती नसून या संदर्भात निर्णय राज्य सरकार निर्णय घेऊ शकते, अशी माहिती वैद्यकीय संचालकांनी मोर्चाच्या नेत्यांना दिली. मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न न्यायालयात दाखल करण्यात आल्याने सरकार निर्णय घेईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पी. टी. वाकोडे यांनी सांगितले.
मराठा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व पूर्तता शासनाच्या वतीने करण्यात येईल. न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडून या सगळ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही शासनाच्या वतीने करणार आहोत, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
आमच्यावर अन्याय होत असेल तर सर्व भरती प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात यावी. आम्हाला विश्वास आहे, की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी सांगितले.