मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे जगणे सुसह्य करण्यासाठी 19 ते 25 जून या दिवसात 'सेवा सप्ताह' आयोजित करणार आहे. या सप्ताह अंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
या 'सेवा सप्ताह' निमित्ताने गावातील, शहरातील प्रत्येक विभाग, वार्डात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यादरम्यान ज्या गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या 'न्याय किट' चे वाटप करण्याचा कार्यक्रम युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे आणि रोजगार बंद पडल्यामुळे शहरी भागातील स्थलांतरित मजूर गावाकडे निघून गेलेत. गावीदेखील काम नसल्यामुळे या सर्व मजुरांच्या पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांना मदत केली जाणार आहे. यासाठी युवक काँग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास त्या सोडवणार आहे. सोबतच नवीन कामगारांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून देणार आहे.
कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलीसखाते आणि पालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे कोरोनापासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यामध्ये कोरोना योध्यांचा सत्कारही करणार आहे.