मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद दिला आहे. दोन्ही विभागांनी त्यांचे तीन दिवसांचे वेतन सुमारे १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
त्या व्यतिरिक्त काही सभासदांनी उत्स्फूर्तपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी असलेल्या खात्यामध्ये भरीव रक्कम या अगोदरच हस्तांतरित केली आहे. यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे मोटार वाहन अधिकारी संघटनेने जाहीर केले.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जगभर पसरलेल्या या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात देखील पसरत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यासंदर्भातील योग्य त्या सूचना वेळोवेळी परिवहन विभागाला देण्यात येत आहेत, असेही परब यांनी यावेळी संगितले.