मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा अन्य प्रकरणांमध्ये कुटुंबापासून दूर गेलेल्या व बेपत्ता झालेल्या महिलांचा आणि तरुणींचा शोध घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या मदतीने पथक निर्माण करणार असल्याची माहिती, राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा ( Minister Mangal Prabhat Lodha ) यांनी दिली आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यांचा शोध - आफताब आणि श्रद्धा वालकर या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडीचे प्रकरण समोर आले आहे. यातील तरुणीचा दुर्दैवीरीत्या खून झाला आहे. यामुळे ही बाब समोर आली मात्र महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडत आहेत. अनेक तरुणी बेपत्ता आहेत आपल्या कुटुंबापासून दूर गेलेल्या आहेत. अठरा वर्षे झाल्यानंतर आपल्याकडे असलेल्या सज्ञान कायद्यानुसार या मुलींना त्यांचे कुटुंबीय थांबवू शकत नाहीत, कुणाशी लग्न करावे अथवा कुणासोबत राहावे याचा सर्वस्वी निर्णय या तरुणी घेऊ शकतात. त्यामुळे असे निर्णय चुकल्यास त्या कुटुंबापासून दूर होतात आणि कुटुंबाकडे मदतही मागत नाही, अशा मुलींचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे.
महिला आयोगाच्या मदतीने विशेष पथक - राज्यातील अशा बेपत्ता झालेल्या अथवा कुटुंबापासून दूर गेलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी राज्य महिला आयोगाला निर्देश दिले असून अशा पद्धतीचे एक विशेष पथक तयार करण्यात यावे आणि या पथकाच्या माध्यमातून अशा मुलींचा शोध घेण्यात यावा जेणेकरून त्यांना सुरक्षितता प्रदान करता येईल, यासाठी हे निर्देश देण्यात आले असून लवकरच असे पथक तयार करून महिलांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.