मुंबई - मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी नाराजी व्यक्त करत सरकारने न्यायालयाच्या 25 तारखेच्या निर्णयाची वाट बघायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे मराठा समाजाचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होणार आहे, असेही त्यांनी म्हटले. तसेच ईडब्ल्यूएसबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून 50 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सरकारची दुटप्पी भूमिका -
सरकारने 50 टक्क्यांमध्ये आरक्षण देऊन हा विषय संपुष्टात आणला पाहिजे. परंतु बैठकीला बसल्यावर एक विषय मांडायचा आणि कृती करताना दुसरा निर्णय घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका जर सरकार घेत असेल, तर मराठा समाजासाठी हे घातक ठरणार आहे. यामुळे मराठा समाजाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होणार आहे. तसेच मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही पवार यांनी सांगितले.