मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाईन शॉपमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी इ–टोकन सुविधा कालच उपलब्ध केली आहे. आता दारू घरपोच मिळणार असल्याचा दुसरा सुखद धक्का शासनाने मद्यप्रेमींना दिला आहे. मद्य विक्रीच्या दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी हे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केले आहेत.
सध्या राज्यात मुंबई शहर, उपनगर, उस्मानाबाद आणि लातूर वगळता इतर ठिकाणी वाईन शॉप मधून मद्य विक्री सुरू आहे. मद्यखरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाईन शॉपमध्ये होणाऱ्या गर्दीपासून सुटका व्हावी आणि कोरोनाचा प्रसार टाळाता यावा, यासाठी कालच इ–टोकन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता टाळेबंदीच्या कालावधीत वाईन शॉप मालकांना ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, अटी आणि शर्तींचे पालन करून परवानाधारक दुकानदारांना भारतीय बनावटीचे, विदेशी मद्य, बीअर, सौम्य मद्य, वाईनची विक्री त्यांच्या निवासी पत्तावर घरपोच देण्यात येणार आहे. यासाठी परवानाधारकाकडे मद्यासाठी मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित वाईन शॉप मालकाने मद्याची घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली आहे, अशी व्यक्ती संबंधित ग्राहकांच्या पत्त्यावर मद्य पोच करणार आहे. अशी घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीला मास्कचा वापर आणि वेळोवेळी हाताचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सध्या सुरू करण्यात आलेली घरपोच मद्य विक्रीची सेवा राज्यात टाळेबंदी असेपर्यंत सुरू राहणार आहे. आज जारी करण्यात आलेल्या आदेशात बदल अथवा ते रद्द करू नयेत, असेही नमूद केले आहे. ज्या वाईन शॉप मालकांकडे भारतीय बनावटीचे, विदेशी मद्य, बीअर, सौम्य मद्य, वाईनची विक्री करण्याचा परवाना आहे, अशा मद्य विक्रेत्यांनाच ग्राहकांना घरपोच मद्य पोहवण्यास परवानगी देण्यात आली आहे. विहीत केलेल्या दिवशी आणि वेळेतच विदेशी मद्याची विक्री व वितरण केवळ वाईन शॉप मालकाच्या आवारातूनच करता येणार आहे. या निर्णयामुळे मद्यप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, वाईन शॉपच्या बाहेर होणारी गर्दी अटोक्यात येण्यास मदत होणार आहे.