मुंबई - राज्यातील सर्व शाळा आज (सोमवार) ऑनलाईन सुरू केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक सत्राची सुरुवात कधी करायची, यासाठी शालेय शिक्षण विभागच संभ्रमात सापडले आहे. आज दिवसभर झालेल्या अनेक बैठकांमध्येही यासाठीचा अंतिम निर्णय झाला नसल्याने त्यासाठीचे कोणताही निर्णय अथवा परिपत्रक विभागाकडून रात्री उशीरापर्यंत जारी करण्यात आलेले नाही. यामुळे उद्या राज्यातील शाळा या सरकारच्या आदेशाविनाच ऑनलाईन सुरू केल्या जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.
सध्या राज्यात कोरोनाच्या प्रार्दुभावाने थैमान घातले असल्याने राज्यात शालेय शिक्षणाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात ही कधी करायची यावर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. यामुळे उद्या यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत एक बैठक घेऊनच यासाठीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील काही आठवड्यांपूर्वी राज्यातील शाळा या ऑनलाईन पद्धतीने १५ जूनपासून सुरू केल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांनी यासाठी आपली तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये शिक्षकांना तातडीने आपल्या शाळांमध्ये 15 जून रोजी हजर राहण्याचे आदेश मागील काही दिवसात देण्यात आले आहेत. यामुळे उद्या मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये शिक्षक हजर राहणार असून शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन शिक्षणाने सुरू केला जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने यासाठीचा कोणताही आदेश काढला नसला तरी राज्यात उद्या ऑनलाईन शिक्षणाचा पहिला दिवस असणार आहे. मात्र, शैक्षणिक सत्राची सुरुवात कधी करायची याबद्दल शिक्षण विभागात एकमत झालेले नाही. त्यामुळे, याविषयी राज्यातील शाळांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याने उद्या गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या सरकारस्तरावर निर्णय होण्याची शक्यता
शैक्षणिक सत्राच्या संदर्भात आज आमच्या बैठका झाल्या आहेत. त्यात राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा सुरू केल्यास त्यावर काय परिणाम होतील, यावर चर्चा झाली आहे. उद्या सरकारच्या स्तरावर महत्वाची बैठक होणार असून त्यात शैक्षणिक सत्राची कधीपासून सुरूवात होईल याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.