मुंबई - राज्यातील पदवी, पदविका आणि पदव्युत्तरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश (सीईटी)परीक्षाही कोरोनामुळे अडचणीत आल्या आहेत. मार्च ते मे महिन्यात या परीक्षा आणि त्या संबधित सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या परीक्षा थांबल्या असून त्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कोरोनाचे संकट टळेपर्यंत वाट बघण्याची भूमिका घेतली आहे.
२३ एप्रिलला राज्य एमएचटी-सीईटी-२०२० ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु आता केंद्र सरकारने देशभरातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे सीईटी सेलकडून ही परीक्षाही पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक काढले जाणार असल्याची माहिती सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली.
राज्य सीईटी सेलकडून तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांतील बीटेक, बी.ई, फार्मसी, कृषी, फाईन आर्ट, पशू व मत्स्य विज्ञान आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याच प्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्टी., एम.एचएमसीटी आदींसाठीही सीईटी सेल सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करते. उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या एम.एड, एम.पीएड, बी.एड, एलएलबी, बी.पी.एड, आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या नीट-पीजीएम या प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जाते.
यापैकी वैद्यकीय प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षा झाल्या असून इतर अनेक परीक्षा या या महिन्यात घेण्यासाठी वेळापत्रक आणि नियोजन ठरले होते. परंतु कोरोनामुळे या सर्वच परीक्षांचे गणित बिघडले असल्याने सीईटी सेलही संभ्रमात सापडले आहे. बहुतांश परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्या तरी लॉकडाऊन संपेपर्यंत काहीही पर्याय नसल्याचे सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले.