मुंबई - कोरोनाच्या काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 'महाकार्गो'ने अवघ्या वर्षभरात भरारी घेतली आहे. खासगी वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत किफायतीशीर दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या 'महाकार्गो'ने गेल्या वर्षभरात मालवाहतुकीसाठी १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार करत महामंडळाच्या तिजोरीत ५६ कोटींचा महसूल जमा केला आहे.
'महाकार्गो' या नावाने हा ब्रँड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केला. शासनाच्या निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतूकीवरही विपरित परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मे २०२० पासून राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली. खासगी वाहतुकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीचीही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली. जलद, खात्रीशीर आणि सुरक्षीत सेवा देणाऱ्या मालवाहतूकीला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ़मिळाला. मालवाहतूकीला मिळालेला हा प्रतिसाद पाहून महामंडळाने 'महाकार्गो' या नावाने हा ब्रँड विकसित केला आहे. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रूपात 'महाकार्गो' या नावाने रस्त्यावर धावत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत विभाग नियंत्रकांमार्फत मालवाहतुकीचे नियोजन केले जाते. या मालवाहतूकीवर महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नियंत्रण ठेवले जात असून, मालवाहतुकीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे.
'१०० कोटींचे उद्दीष्ट'
मालवाहतूकीसाठी एसटीच्या ताफ्यात 'महाकार्गो'चे १ हजार १५० ट्रक आहेत. 'महाकार्गो'ने आतापर्यंत ९५ हजार फेऱ्यांच्या माध्यमातून ७ लाख मेट्रीक टन मालाची वाहतूक केली असून, तब्बल १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. मालवाहतूकीच्या माध्यमातून महामंडळाला वर्षभरात ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शासनाच्या वतीने रेशनिंगवर पोहोचवला जाणारा अन्न-धान्यांचा पुरवठा, बी-बीयाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, खासगी कंपन्या याचबरोबर कोकणातील आंबा बागायतदार तसेच सिमेंट कंपन्याही मालाच्या वाहतुकीसाठी 'महाकार्गो' ट्रकचा उपयोग करीत आहेत. महामंडळाने पुढील वर्षभरात मालवाहतुकीतून १०० कोटी रुपयांपर्यंत महसूलाचे उद्दीष्ट गाठण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, विविध शासकीय विभागामार्फत खासगी मालवाहतूकदारांकडून जी मालवाहतूक करण्यात येते त्यातील २५ टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. मालवाहतुकीसंदर्भात अधिक माहितीसाठी (०२२-२३०२४०६८) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही एसटी महामंडळाने केले आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! डॉक्टरांनी मृत रुग्णावर चक्क ४ दिवस केला उपचार, नांदेडमधील रुग्णालयातील प्रकार