मुंबई - एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचवले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी यासंदर्भात आदेश दिले होते.
नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे 250 एसटी बसेसद्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करत चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले . त्याचबरोबर परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे 3 हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छित जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यात आले. अशा प्रकारे आज दिवसभरात सुमारे 8 हजार मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे शिवधनुष्य एसटीने लिलया पेलले आहे.
भर उन्हात पायपीट करून व्याकुळ झालेल्या मजुरांना अत्यंत आपुलकीने विचारपूस करून एसटी बसेस मध्ये बसवुन, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार त्यांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. याबद्दल या मजुरांनी एसटी महामंडळाचे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत. यापुढे देखील लाॅक-डाऊन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.